पाकिस्तानी तपासयंत्रणांकडून अनपेक्षितरित्या करण्यात आलेल्या मदतीनंतर भारताकडून गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला करण्यासाठी घुसलेल्या १० पैकी ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नसीर खान जनुजा यांनी काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्यादृष्टीने दहा दहशतवाद्यांनी सीमारेषा पार केल्याची माहिती भारताला दिली होती. यापैकी तीन दहशतवाद्यांना शुक्रवारी कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली. मात्र, अद्यापही सात दहशतवाद्यांचा ठावठिकाणा न लागल्याने या संपूर्ण मोहिमेबद्दल गुप्तता बाळगण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लष्करे तैयबा आणि जैश-ए-मुहम्मद या संघटनांचे ‘फिदायीन’ असलेल्या या दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे गुजरातमध्ये दाखल झाले होते. पाकिस्तानकडून ही माहिती देण्यात आल्यानंतर गुजरातमधील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली होती.