News Flash

दहशतवादाच्या प्रतिकारासाठी भारत-बांगलादेशाने एकत्र यावे- मोदी

गांधी शांतता पुरस्काराने शेख मुजीबूर रहमान यांचा सन्मान करणे हे भारतीयांसाठी अभिमानास्पद

(संग्रहित छायाचित्र)

 

भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी भारतीय उपखंडातील दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी एकजूट दाखवण्याची आणि जागरूक राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात केले.

व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात आपल्याला समान संधी आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, परंतु त्याचवेळी आपल्याला दहशतवादाचाही धोका आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले, ‘‘अशा प्रकारच्या अमानवी कृत्यांमागील शक्ती आजही सक्रिय आहेत. त्यांच्या प्रतिकारासाठी आपण जागरूक आणि संघटित राहिले पाहिजे.’’

पंतप्रधान मोदी यांनी २०२० चा गांधी शांतता पुरस्कार बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या  कन्येकडे सुपूर्द केला. गांधी शांतता पुरस्काराने शेख मुजीबूर रहमान यांचा सन्मान करणे हे भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी १९७१च्या बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. ढाक्यापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर मोदी यांनी पुष्पचक्र वाहिले. या वेळी बांगलादेशचा राष्ट्रध्वज समारंभपूर्वक अध्र्यावर उतरविण्यात आला. मोदी यांच्या हस्ते या वेळी वृक्षारोपणही करण्यात आले.

मोदी यांनी सत्तारूढ महाआघाडीच्या त्याचप्रमाणे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. या वेळी द्विपक्षीय संबंधांसह विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आले आहेत.

गुंतवणुकीचे निमंत्रण

बांगलादेशातील तरुण-तरुणींसाठी स्वर्ण जयंती शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आणि ५० बांगलादेशी उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले.

गांधी शांतता पुरस्कार

ढाका : बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबूर रहमान यांना भारताने जाहीर केलेला २०२० चा गांधी शांतता पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी येथे रहमान यांच्या कन्या शेख रेहाना यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

पोलीस गोळीबारात ४ निदर्शक ठार

चितगाँव/ढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याविरुद्ध शुक्रवारी चितगाँवमध्ये निदर्शने करण्यात आली. या वेळी निदर्शकांनी एका पोलीस ठाण्यावर हल्ला केला तेव्हा त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळाबारात चार जण ठार झाल्याचे वृत्त आहे. त्याचप्रमाणे ढाका येथेही हिंसक निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी रबरी गोळ्यांचा आणि अश्रुधुराचा वापर केला. भारतामधील अल्पसंख्य मुस्लीमांंना नरेंद्र मोदी परकीयांप्रमाणे वागणूक देत असल्याच्या आरोप चितगाँवमधील इस्लामी गटाच्या हजारो समर्थकांनी केला. चितगाँवमधील रुग्णालयामध्ये आठ जणांना जखमी अवस्थेत आणण्यात आले, ते गोळ्या लागून जखमी झाले होते, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:27 am

Web Title: india and bangladesh should come together to fight terrorism abn 97
Next Stories
1 शेतकऱ्यांच्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
2 प. बंगाल, आसाममध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान
3 निवडणूक रोखेविक्रीस स्थगिती नाही
Just Now!
X