पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमधील चकमक टाळण्यासाठी संघर्षांच्या सर्व ठिकाणांहून सैन्य माघारी घेणे गरजेचे आहे, असे भारताने चीनकडे स्पष्ट केले आहे. योग्य वेळी संपर्क साधून एकमेकांच्या मतांची देवाणघेवाण शक्य व्हावी यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हॉटलाइन सुरू करण्याचे मान्य केले आहे.

पूर्व लडाखमधील पँगॉँग त्सो परिसरातून सैन्य मागे घेण्याचे दोन्ही देशांनी मान्य केल्यानंतर पहिल्यांदाच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी गुरुवारी दूरध्वनीवरून संपर्क साधला. सीमा प्रश्न सोडविला जाण्यास कदाचित वेळ लागेल, मात्र शांततेचा भंग झाल्यास त्याचा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. त्यानंतर जयशंकर आणि वांग यी यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे मान्य करून त्यासाठी हॉटलाइन सुरू करण्यास अनुमती दर्शविली. चीननेही गुरुवारी तसे प्रसिद्धीपत्रक जारी केले.