पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा सहभाग असल्याच्या पुराव्यांची फाईल भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांकडे सोपवली आहे. तसेच पाकने आपल्या हद्दीत असलेल्या दहशतवाद्यांवर तसेच दहशतवादी कारवायांविरोधात तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, पाकिस्तानकडून आज सकाळी भारतीय हवाई हद्दीत बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना समन्स बजावले होते. यावेळी त्यांच्याजवळ भारताने पाकिस्तानकडून भारतीय हवाई सीमांचे उल्लंघन आणि सैन्य तळांवर हल्ले करण्यावर आक्षेप घेतला. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, पाकिस्तानची ही कारवाई भारताने एक दिवस आधी केलेल्या हवाई हल्ल्यापेक्षा वेगळी आहे. भारताने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रांना निशाणा बनवला होता. तर पाकिस्तानने भारताच्या सैन्य तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला.

त्याचबरोबर भारताने भारतीय हवाई दलाच्या पायलटच्या आक्षेपार्ह व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे. भारताने म्हटले की, पाकिस्तानने केलेला हा प्रकार आंतरराष्ट्रीय मानव कायदा आणि जिनिव्हा परिषदेचे उल्लंघन आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानला हे स्पष्ट करण्यात आले आहे की, त्यांच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलटला कोणतीही इजा होता कामा नये. भारत त्याच्या सुरक्षित आणि त्वरीत परताव्याची आशा करतो.

पाकिस्तानने एक व्हिडिओ रिलीज केला होता. यामध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे पायलट असल्याचा दावा केला जात आहे. पकडण्यात आलेली व्यक्ती भारतीय हवाई दलाचा पोषाख घातला असून त्याने आपली ओळख पटवणारी संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच मी सध्या पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता अद्याप समोर आलेली नाही.