चाबहार बंदराचा विकास,  अफगाणिस्तानचाही सहभाग

सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या चाबहार बंदराचा विकास करून पाकिस्तानला डावलत अफगाणिस्तानला थेट रेल्वे व रस्तामार्गे जोडण्याच्या ऐतिहासिक करारावर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, इराणचे अध्यक्ष हसन रोहानी आणि अफगाणिस्तनाचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. चाबहार बंदराच्या विकासासाठी भारत ५० कोटी डॉलरची मदत इराणला देणार आहे.

चीनने पाकिस्तानातील ग्वादार बंदराचा विकासप्रकल्प हाती घेतल्यानंतर चीनला काटशह देण्यासाठी चाबहार बंदर विकासाचा पर्याय भारताने स्वीकारला होता. इराणवरील आर्थिक र्निबध दूर झाल्यानंतर या पर्यायाला महत्व प्राप्त झाले होते. या पाश्र्वभूमीवर मोदी यांनी इराणचे अध्यक्ष रोहानी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष गनी यांच्या उपस्थितीत चाबहार बंदरविकासाच्या करारावर स्वाक्षरी केली. या मुख्य कराराबरोबरच उभय देशांत अ‍ॅल्युमिनियम प्रकल्प उभारणी अन्य अनेक करारांवरही स्वाक्षऱ्या झाल्या. तसेच दहशतवादाचा एकत्रित मुकाबला करण्याच्या मुद्दय़ावरही उभय नेत्यांनी सहमती दर्शवली. याशिवाय अर्थ, व्यापार, वाहतूक, बंदर विकास, संस्कृती, विज्ञान व शैक्षणिक सहकार्य या क्षेत्रांत दोन्ही देशांनी सहकार्य करण्याचे ठरवले आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर पंधरा वर्षांनी इराणला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. चाबहार बंदराचा पहिला टप्पा इराणमध्ये भारताच्या मदतीने विकसित केला जाणार आहे. दक्षिण इराणच्या किनारी भागात सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात हे बंदर आहे. एक्झिम बँक ऑफ इंडियाने इराणला १५० दशलक्ष डॉलर्सचा पतपुरवठा करण्याचा करार केला आहे. चाबहार बंदर ते झाहेदान या दरम्यान रेल्वेमार्ग सुरू करण्यासाठी इरकॉनने करार केला आहे.

भारत सरकारच्या नाल्को कंपनीने चाबहार येथील मुक्त व्यापार विभागात पाच लाख टन अ‍ॅल्युमिनियम स्मेल्टर सुरू करण्यासाठी समझोता करार केला आहे. यात इराणने स्वस्त दरात नैसर्गिक वायू देणे अपेक्षित आहे.

इराणमधील निर्यात हमी निधी व भारतीय निर्यात हमी महामंडळ यांनीही करार केले आहेत. धोरणनिर्मिती व वैचारिक आदानप्रदान विषयावर परराष्ट्र खात्यांनी समझोता करार केले. स्कूल फॉर इंटरनॅशनल रिलेशन्स व द फॉरेन सव्‍‌र्हिस इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थांमध्ये परराष्ट्र संबंध अभ्यास संशोधनावर करार झाला आहे.  इराण व भारताचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय तसेच नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडिया व नॅशनल लायब्ररी ऑफ इराण या संस्थांमध्येही करार झाले आहेत.

पाकिस्तानला वळसा

चाबहार बंदरापासून इराणमधील झाहेदान ते अफगाणिस्तानच्या निमरोझ प्रांतातील झरंज व देलारामपर्यंत महामार्ग विकसित केला जाणार आहे. त्यामुळे भारताला पाकिस्तानला वळसा घालून अफगाणिस्तानशी संपर्क साधणे शक्य होणार आहे.

तसेच चाबहार ते इराणमधील माशादमार्गे युरोप व रशियाशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (एनएसटीसी) विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे. तो मार्ग तयार झाल्यानंतर भारत ते युरोप समुद्रमार्गाच्या तुलनेत ६० टक्के वेळ आणि ५० टक्के खर्च वाचणार आहे.

इराण आणि अफगाणिस्तान यांच्याशी केलेल्या करारामुळे तीनही देश जवळ येणार आहेत. तीनही देशांमधील आर्थिक विकासाला त्यामुळे गती मिळेल. या कराराच्या अंमलबजावणीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

(((   भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांच्यात चाबहार बंदर विकासाच्या मुद्दय़ावर सोमवारी त्रिपक्षीय करार झाला. इराणच्या अध्यक्षीय प्रासादात या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी इराणचे अध्यक्ष हसन रोहानी व अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांच्याशी हस्तांदोलन केले.  )))