अमेरिकेच्या दबावासमोर न झुकता भारताने रशियाकडून अत्याधुनिक एस-४०० ही हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण हा ३९ हजार कोटी रुपयांचा व्यवहार असून भारत रशियाकडून एस-४०० च्या पाच सिस्टीम विकत घेणार आहे. यामुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक बळकट होईल.

मागच्या दोन ते तीन वर्षांपासून भारत आणि रशियामध्ये या व्यवहाराची बोलणी सुरु असून भारत आता ही प्रणाली विकत घेण्याच्या निर्णयाप्रत आला आहे. देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. अमेरिकेचा सीएएटीएसए हा कायदा अंमलात येण्याआधी भारताकडून हा व्यवहार पूर्ण केला जाईल.

या कायदातंर्गत अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांना रशियाकडून सुरक्षा सामग्री विकत घेण्यावर निर्बंध आणले आहेत. क्षत्रूची क्षेपणास्त्रे, टेहळणी विमाने, स्टेलथ तंत्रज्ञानाने युक्त असलेली फायटर विमाने शोधून नष्ट करण्याची एस-४०० ची क्षमता आहे.