भारत-चीन वादामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाराज असल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवले, असा दावा अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी केला असला तरी मोदी यांचे अलीकडच्या काळात ट्रम्प यांच्याशी लडाखमधील प्रश्नावर बोलणेच झालेले नाही, असे स्पष्टीकरण सरकारी सूत्रांनी केले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याशी आपण चीनबरोबर पूर्व लडाखमध्ये जो पेच निर्माण झाला त्यावर बोललो असे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यावर भारताच्या सरकारी सूत्रांनी सांगितले की, अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी मोदी यांचे अलीकडे दूरध्वनीवर बोलणे झालेले नाही. यापूर्वी चार एप्रिल रोजी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांच्या संदर्भात दोन्ही नेत्यात चर्चा झाली होती. त्यानंतर बुधवारी व गुरुवारी असे दोनदा भारत व चीन यांच्यात मध्यस्थी करण्याची तयारी असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते, पण तो प्रस्ताव भारताने गुरुवारी फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अत्यंत खुबीने निवेदन  करताना दोन्ही देशात तणाव निवारणाची व्यवस्था असून राजनैतिक मार्गाने हा प्रश्न सोडवण्यात येईल असे सांगितले होते. गेले तीन आठवडे भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखमधील भागात तणाव आहे.