सुरक्षा परिषद बैठकीनंतर भारताने पाकिस्तानला ठणकावले

संयुक्त राष्ट्रे : दहशतवाद थांबवला तरच चर्चा शक्य आहे, असे भारताने शुक्रवारी पाकिस्तानला ठणकावले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंदद्वार बैठकीच्या पाश्र्वभूमीवर भारताने दहशतवादाच्या मुद्दय़ावर पाकिस्तानच्या वर्मावर बोट ठेवले आहे.

काश्मीरचा विशेष दर्जा भारताने रद्द केल्याच्या मुद्दय़ावरून चीनच्या मागणीनुसार शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बंदद्वार बैठक झाली. त्यानंतर चीनचे दूत शिंग जुन यांनी, उभय देशांनी आपापसातील प्रश्न शांततेच्या आणि संवादाच्या मार्गाने सोडवावेत आणि तणाव वाढू देऊ नये, असे आवाहन केले होते. त्या पाश्र्वभूमीवर भारताने आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रांतील दूत सईद अकबरुद्दिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काश्मीरमधील स्थिती सुरळीत आणि शांत व्हावी हीच आमची इच्छा आहे. काश्मीरप्रश्नी झालेल्या सर्व करारांवर आम्ही ठाम आहोत. मात्र काही देश जिहादचा वापर करीत भारतात रक्तपाताला वाव देत आहेत. हिंसाचार हे कोणत्याही समस्येवरचे उत्तर होऊ शकत नाही. दहशतवाद थांबवा, मगच आम्ही चर्चेला तयार आहोत!

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करणे ही सर्वार्थाने भारताची अंतर्गत बाब आहे. अन्य कोणत्याही देशाने त्यात हस्तक्षेप करण्याचे कारणही नाही. पाकिस्तानचे नाव न घेता ते म्हणाले की, काहीजण काश्मीरच्या नावावर आकाश-पाताळ एक करण्याची धडपड करीत आहेत. पण वास्तवापासून ते भरकटल्याचेच लक्षण आहे.

सुरक्षा परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने प्रथमच काश्मिरी जनतेचा स्वर आंतरराष्ट्रीय पातळीवर ऐकला गेला, असे मत पाकिस्तानच्या दूत मलीहा लोधी यांनी पत्रकार परिषदेत मांडले.

‘सरकारला आणखी वेळ’

जम्मू-काश्मीरमध्ये माध्यमनिर्बंध हटविण्याचा आदेश देण्याआधी तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारला थोडा वेळ देणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. ‘काश्मीर टाइम्स’च्या कार्यकारी संपादक अनुराधा भसीन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळी जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

इम्रान आणि ट्रम्प यांची चर्चा :

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून काश्मीर प्रश्नावर चर्चा केली. काश्मीर प्रश्नावरून एकमेकांच्या संपर्कात राहण्यावरही या चर्चेत एकमत झाले, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महम्मद कुरेशी यांनी सांगितले. सुरक्षा  परिषदेच्या बैठकीआधी खान यांनी समितीच्या चार स्थायी सदस्य देशांशी चर्चा केल्याचा दावाही कुरेशी यांनी केला.