आयएसआय एजंट असल्याचा दावा करणारा मानसिकदृष्टय़ा अस्थिर

मी पाकिस्तानच्या आयएसआयचा हस्तक आहे, मला भारतात राहावयाचे आहे, असे सांगून भारतीय सुरक्षारक्षकांना चक्रावून टाकणाऱ्या पाकिस्तानच्या नागरिकाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे निदर्शनास आल्याने त्याला नेपाळला पाठविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी येथे सांगितले.

देशातील विविध सुरक्षा यंत्रणांनी मोहम्मद अहमद शेख मोहम्मद रफिक (३८) याची कसून चौकशी केली तेव्हा रफिकची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे आढळले. त्याने केलेल्या दाव्यात तथ्य नसल्याचे आढळले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रफिककडे पाकिस्तानचा पासपोर्ट आहे, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर त्याने पाकिस्तानच्या आयएसआयचा हस्तक असल्याचे आणि आता भारतात वास्तव्य करण्याची इच्छा असल्याचे २८ एप्रिल रोजी विमानतळावरील मदतकार्य कक्षात येऊन सांगितले होते. तो दुबईहून आला होता आणि त्याच दिवशी तो काठमांडूला रवाना होणार होता.

रफिकची चौकशी केल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी मनोरुग्णालयातील डॉक्टरांना पाचारण केले, रफिकची तपासणी केली असता त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याला नेपाळला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारी एअर इंडियाच्या विमानाने त्याला काठमांडूला पाठविण्यात आले.