चीनकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. आधी २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या जवानांनी तो प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. चीनकडून सातत्याने सुरु असलेल्या या आक्रमक, चिथावणीखोर कृतीच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनला फ्रंटलाइन तुकडयांना नियंत्रणात ठेवा असे बजावले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- चीनला लागून असलेल्या सीमांवर हाय अलर्ट, तणाव कमी करण्यासाठी ‘ड्रॅगन’बरोबर चर्चा

दरम्यान लडाखमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी आजपासून सुरु होणारा म्यानमार दौरा रद्द केला आहे. विशेष प्रतिनिधींच्या बैठकीत तणाव कमी करण्यासाठी जे ठरलं होतं, त्याचं चीनकडून उल्लंघन सुरु आहे असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

आणखी वाचा- ‘त्या’ रात्री चीनला काही कळण्याआधीच भारतीय सैन्याने केलं ‘चेक मेट’…

भारताने अरुणाचलमध्ये पाठवल्या सैन्य तुकडया

जून महिन्यात हिमालयातील पश्चिम भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष सुरु झाल्यानंतर भारताने पूर्व भागातही सैन्य तैनाती सुरु केली होती. अरुणाचल प्रदेशच्या अनजॉ जिल्ह्यामध्येही सैन्याच्या हालचाली सुरु आहेत. आधीपासूनच इथे सैन्य तैनाती सुरु होती. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर अरुणाचलमध्येही मोठया प्रमाणावर सैन्य तैनाती करण्यात आली. लडाखच्या तुलनेत अरुणाचल सीमेवर शांतता आहे. पण १९६२ सालच्या युद्धाचा अनुभव लक्षात घेत, भारताने आधीपासूनच आवश्यक खबरदारी घेत सैन्य तैनात केले आहे.