News Flash

फाइव्ह जी तंत्रज्ञान विकासात भारत-अमेरिका-इस्रायल सहकार्य

खुली, विश्वासार्ह, सुरक्षित फाइव्ह जी संदेशवहन यंत्रणा उभारण्यास प्राधान्य दिले जाईल

(संग्रहित छायाचित्र)

 

मोबाइलच्या ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारण्यात हुआवे या चीनच्या कंपनीला अमेरिका व भारतासह अनेक देशांनी वगळले असतानाच आता ही यंत्रणा उभारण्यासाठी भारत, इस्रायल व अमेरिका हे सहकार्य करणार आहेत.

खुली, विश्वासार्ह, सुरक्षित फाइव्ह जी संदेशवहन यंत्रणा उभारण्यास प्राधान्य दिले जाईल, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. फाइव्ह जी तंत्रज्ञानात या तीन देशांनी पुढाकार घेतला असून अमेरिकेतील भारतीय लोक व इस्रायल यांच्यातील संपर्कातून हा प्रस्ताव पुढे आला आहे. या तीन देशांनी सहकार्य करावे, असे जुलै २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमधील भेटीत सूचित केले होते.

यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या संस्थेच्या उपप्रशासक बोनी ग्लिक यांनी सांगितले की, हे सहकार्य म्हणजे हिमनगाचे टोक आहे. अनेक क्षेत्रात आम्ही सहकार्य करणार आहोत.

भारत-अमेरिका-इस्रायल यांच्या आभासी शिखर बैठकीत त्यांनी सांगितले की, जगातील विकासाची आव्हाने हे तीन देश एकत्र येऊन पेलू शकतात. इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का व त्यांचे इस्रायलमधील समपदस्थ संजीव सिंगला यांची भाषणे झाली.

ग्लिक यांनी सांगितले की, फाइव्ह जी तंत्रज्ञानात तीनही देश सहकार्य करतील. सिलिकॉन व्हॅली, बंगळूरु, तेलअवीव यांनी तंत्रज्ञानाची प्रमुख ठिकाणे म्हणून नाव कमावले आहे. त्यामुळे तीनही देश फाइव्ह जी तंत्रज्ञानात आश्वासक कामगिरी करू शकतील. कुठल्याही देशाला या तंत्रज्ञानात मक्तेदारी मिरवता येणार नाही, असे त्यांनी चीनचा उल्लेख टाळून सांगितले.

अमेरिका, भारत व इस्रायल यांच्यात संरक्षण विषयांवर जी चर्चा होते ती गुप्त असते पण तंत्रज्ञान विकासात आमचे सहकार्य खुले व पारदर्शक आहे.अमेरिकेतील भारतीय तंत्रज्ञ एम. आर. रंगास्वामी यांनी सिलिकॉन व्हॅली, तेल अवीव व बंगळूरु यांच्या सहकार्याची कल्पना इस्रायलमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या २०१७ मधील दौऱ्यात मांडली होती. यावेळी शिकागोतील डॉ. भारत बराई व आशिया पॅसिफिक इन्स्टिटय़ूटचे निस्सीम रूबेन यांचीही भाषणे झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 12:06 am

Web Title: india us israel cooperation in 5g technology development abn 97
Next Stories
1 राफेल ‘आयएएफ’मध्ये गुरुवारी औपचारिकपणे दाखल
2 आरोग्य संघटना आणि चीनची जिनपिंग यांच्याकडून प्रशंसा
3 बंगळूरुतील उड्डाणपुलास स्वा. सावरकर यांचे नाव
Just Now!
X