आज जगामध्ये कोणत्याही देशाला शेजारच्या देशाकडून भारताइतका धोका नाही, असे मत भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी.एस. धनोआ यांनी दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये व्यक्त केले. हाच धोका लक्षात घेऊन राफेल करार किती गरजेचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना तिबेटमध्ये चीनने लढाऊ विमाने तैनात केल्याचा दावा त्यांनी केली. यामुळेच आप्तकालीन स्थितीमध्ये अगदी कमी वेळामध्ये चीन मोठा फौजफाटा भारताच्या सीमेवर तैनात करु शकतो. तिबेटकडील भारतीय सीमेवर असलेला हा धोका लक्षात घेता भारताला अधिक लढाऊ विमानांची गरज असल्याचे धनोआ यावेळी म्हणाले.

याआधी एप्रिल महिन्यामध्ये धनोआ यांनी चीन भारतीय सीमेजवळ तिबेटमध्ये आपल्या हवाई दलाचे समार्थ्य वाढवताना दिसत असल्याचे म्हटले होते. आप्तकालीन स्थितीमधील मोहिमांसाठी भारताला एकूण ४२ हवाई तुकड्यांची गरज आहे. सध्या भारतीय हवाईदलाकडे ३१ तुकड्याच असल्याची माहिती त्यांनी आज बोलताना दिली. भारतीय हवाई दलात ४२ तुकड्यांचा समावेश भारत हा इतर शेजारच्या देशांच्या तुलनेत आकड्यांच्या हिशेबाने कमीच पडेल असेही धनाओ म्हणाले. तुकड्यांच्या संख्येने कमी असलो तरी भारतीय हवाई दल युद्ध प्रसंगी कोणत्याही देशाच्या आक्रमणाला आपल्या लढाऊ विमानांच्या सहाय्याने चोख प्रतिउत्तर देऊ शकते असा विश्वास धनोआ यांनी व्यक्त केला.

भारताची तयारी किती?

आप्तकालीन स्थितीमध्ये भारतीय हवाई दलाने चीनच्या सीमांपर्यंत रसद आणि सैनिक पोहचवण्यासाठीची व्यवस्था करुन ठेवलेली आहे. भारताने २०१६ साली चीनबरोबर तणाव वाढला होता त्यावेळी लडाखमध्ये लढाऊ विमाने उतरवली होती. त्यावेळी भारतीय हवाई दलाने आपली लढाऊ विमाने चिनी सीमेच्या अगदी जवळ आणून ठेवली होती. सी-१७ ग्लोबमास्टर हे अवाढव्य विमान भारतीय हवाई दलाने मेचुकामधील ४,२०० फुट उंचीवर असणाऱ्या ऍडवांस्ड लँडिग ग्राऊंडवर उतण्यात उतरवले होते. ही जागा भारत-चीन सीमारेषेपासून २९ किलोमीटर अंतरावर आहे. शस्त्रसामग्री आणि रसद दुर्गम भागातील सैन्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सी-१७ ग्लोबमास्टर विमानाचा वापर होतो. लडाख आणि अरुणाचल प्रदेशामध्ये लढाऊ विमाने उतरवण्यासाठी भारतीय हवाई दलाने अनेक धावपट्ट्या तयार केल्या आहेत. सध्या हवाई दलाच्या ताफ्यात सुखोई, तेजस, मिग, मिराज, सी १३० सारखे मालवाहू विमान आणि हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे.