अर्थतज्ज्ञ जाँ द्रेज यांच्या काश्मीर खोऱ्यातील पाहणीतील निरीक्षण

नवी दिल्ली : ये तो बंदूक की खामोशी है.. कब्रस्तान की खामोशी है.. काश्मीर खोऱ्यातील सोपोर गावातील तरुणाची प्रतिक्रिया होती, असे सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘सीपीआयएमएल’च्या नेत्या कविता कृष्णन बुधवारी पत्रकार परिषदेत सांगत होत्या. कृष्णन यांच्यासह नामवंत अर्थतज्ज्ञ जाँ द्रेज, अखिल भारतीय लोकशाहीवादी महिला संघटनेच्या मैमुना मुल्ला आणि ‘एनएपीएम’चे विमल भाई या चौघांनी काश्मीर खोऱ्याचा दौरा केला. केंद्र सरकारने अनुच्छेद ३७० रद्द केल्यामुळे काश्मिरी लोकांमध्ये संताप, आक्रोश, भीती, अविश्वास अशा अनेक भावना एकाचवेळी पाहायला मिळत होत्या, असे या चौघांचेही निरीक्षण होते.

जाँ द्रेज यांच्यासह या चौघांनी काश्मीर खोऱ्यात ९ ते १३ ऑगस्ट असे पाच दिवस अनुच्छेद ३७०, राज्याचे विभाजन, केंद्र सरकारचे धोरण या सगळ्या मुद्यांवर लोकांची मते जाणून घेतली. खोऱ्यातील महिला, विद्यार्थी, मुली, दुकानदार, पत्रकार, उत्तर प्रदेश-बिहारहून आलेले स्थलांतरित कामगार, काश्मिरी पंडित, शीख, मुस्लीम अशा समाजातील विविध घटकांशी या चौघांनी संवाद साधला. या चर्चेचे त्यांनी चित्रण केले आहे. त्यावर आधारित दहा मिनिटांची लघुचित्रफीत तसेच, दहा पानी अहवालही तयार केलेला आहे. त्यात काश्मिरी लोक उघडपणे खोऱ्यातील वास्तव सांगताना दिसतात. त्यात, लोकांच्या तोंडून ‘जुल्म’, ‘जाद्ती’, ‘बरबादी’, ‘धोका’ असे शब्द सतत ऐकायला मिळतात. पाहणी अहवालाची माहिती देण्यासाठी प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. मात्र, प्रेस क्लबने लघुचित्रफीत दाखवण्याची अनुमती दिली नसल्याचा दावा कृष्णन यांनी केला.

फक्त श्रीनगर शहरात नव्हे तर सोपोर, बांदिपुरा, अनंतनाग, पुलवामा, पॅम्पोर, शोपियाँ अशा गावागांमध्ये जाऊन या चौघांनी काश्मिरी लोकांची भेट घेतली. राष्ट्रीय वृत्तवाहिन्या काश्मीर खोऱ्यात सर्वकाही ठीकठाक असल्याचा दावा करत होते. पण, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी फक्त श्रीनगरमध्ये तेही एक छोटय़ा भागातील चित्रण दाखवत होते. या प्रतिनिधींनी श्रीनगरच्या बाहेरचे वास्तव टिपलेले नाही. त्यामुळे खोऱ्यात लोकांच्या भावना नेमक्या काय आहेत, हे कोणालाही समजत नव्हते, असे कविता कृष्णन यांचे म्हणणे होते. खोऱ्यात संपर्काच्या सर्व यंत्रणा बंद आहेत. लोक घरात अडकून पडलेले आहेत. शेजारच्या गावात काय शेजारच्या घरात देखील जाता येत नाही. कुटुंबातील व्यक्तींशी बोलता येत नाही. पण, त्यांच्या घरात टीव्ही सुरू आहे. त्यावर भारतीय वृत्तवाहिन्या खोरे शांत असल्याचा दावा करताना पाहावे लागत आहे. हा काश्मिरी लोकांचा अपमान आहे पण त्यांना सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही, असा मुद्दा चौघा प्रतिनिधींनी मांडला.

खोऱ्यामध्ये भाजपचे प्रवक्ते वगळता एकाही व्यक्तीने आनंद व्यक्त केलेला दिसला नाही. ‘३७०’ आणि ‘३५-अ’ मुळे आमचं भारताशी नातं होतं. आता त्यांनी ते तोडून टाकलं. आम्हाला ‘आझाद’ करून टाकलं, अशा केंद्र सरकारने विश्वासघात केल्याची भावना व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया ठिकठिकाणी उमटल्याची नोंद पाहणी अहवालात घेण्यात आली आहे. चौघे विमानाने श्रीनगरला उतरले तेव्हा नेहमीप्रमाणे मोबाइलचा वापर करण्याची अनुमती देण्यात आली. पण, प्रवासी मात्र उपरोधिक हसत होते. कारण खोऱ्यात केंद्र सरकारने फोनसेवाच बंद केलेली आहे, असा अनुभवही कविता कृष्णन यांनी सांगितला.