केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांची माहिती

राजधानी क्षेत्रातील फटाकेबंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत मी डॉक्टर या नात्याने केले होते. दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी फटाके वाजवण्यास हरकत नाही, पण त्याचे दुष्परिणाम पाहून प्रदूषणविरहित सुरक्षित फटाके तयार करण्याची पद्धत विकसित करावी, असे वैज्ञानिक व उत्पादक संस्थांना सांगण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

फटाकेबंदीचे स्वागत केल्याच्या मुद्दय़ावरून त्यांना समाजमाध्यमातील ‘ट्रोिलग’ला सामोरे जावे लागले होते. याबाबत बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘‘मी पेशाने डॉक्टर आहे. त्यामुळे फटाक्यांमुळे इजा झालेले गंभीर रुग्ण मी पाहिले आहेत. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. तो साजरा केला पाहिजे, पण फटाक्याच्या प्रश्नावर मध्यम मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी प्रदूषणरहित व कमी आवाजाचे फटाके तयार करण्यासाठीची पद्धत विकसित करण्यास वैज्ञानिक व उद्योजकांना सांगितले आहे. अमेरिकेत नववर्षदिनी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तेव्हा तिथे अजिबात प्रदूषण दिसत नव्हते. त्यामुळे आपल्या देशातही असे फटाके असावेत यासाठी प्रयत्न केले जातील,’’ असे हर्षवर्धन म्हणाले.

विज्ञान व भारतीय वारसा यांची सांगड घालण्याचा सरकारचा विचार आहे, मग प्राचीन ज्ञानाचे आपण जतन का करत नाही, असे विचारले असता डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून हे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडियन सायन्स काँग्रेस व इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल हे एकत्र काम करू शकत नाहीत का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की या दोन्हीचे उद्देश वेगळे आहेत, त्यामुळे तसे करता येणार नाही. मुले व सामान्य लोकांपर्यंत विज्ञान नेण्यासाठी हा नवा उपक्रम आहे.

डिजिटल इंडियात प्रगती होत असल्याचा दावा करताना त्यांनी सांगितले, की आमचे सरकार आले त्या वेळी केवळ साडेतीनशे किलोमीटरच्या ऑप्टिकल केबल टाकलेल्या होत्या, आता अडीच लाख किलोमीटरचा टप्पा आम्ही ओलांडला आहे.

सीएसआयआर प्रयोगशाळांच्या संशोधनातूनच आम्ही मधुमेहावरचे औषध तयार केले आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान व पारंपरिक ज्ञान यांची सांगड घातली जात आहे. मुलांना प्रायोगिक शिक्षण मिळावे यासाठी जिज्ञासा उपक्रमात एक हजार विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या प्रयोगशाळांमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वात जास्त भर ईशान्येकडील राज्यांवर आहे. तिथे जैवविविधता अधिक आहे. त्यामुळे अनेक प्रयोगशाळा तिथे उभारण्यात येत आहेत. विज्ञानाच्या माध्यमातून सामान्यांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत, त्यात कुपोषणापासून अनेक बाबींचा समावेश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

काश्मीरबाबत काही भाष्य करण्यास नकार देताना त्यांनी एनआयएने काश्मीरमध्ये जाऊन केलेल्या कारवाईचा उल्लेख टाळत काश्मीरची परिस्थिती सुधारत असल्याचा दावा केला. प्रसारमाध्यमे काश्मीरचे जे चित्र रंगवतात, त्यापेक्षा तेथील खरी परिस्थिती वेगळी असून ती सुधारली आहे, असा दावा त्यांनी केला.

विज्ञान शिक्षणात सुधारणेची अपेक्षा योग्यच आहे, शिक्षण हा राज्यांचा विषय असला, तरी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विज्ञान शिक्षणाचे नवे प्रारूप तयार केले जाईल, असे सूतोवाच त्यांनी केले. विज्ञान संशोधनात भारताचा दर्जा जगाच्या बरोबरीने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुढील विज्ञान महोत्सव ईशान्येत

पुढील वर्षीचा इंटरनॅशनल इंडिया सायन्स फेस्टिव्हल ईशान्येकडील राज्यात घेण्यात येणार आहे, असे हर्षवर्धन यांनी सूचित केले.