विद्यार्थी व्हिसासाठी बेकायदा विद्यापीठात प्रवेश घेतल्याचा आरोप

अमेरिकेत राहायला मिळावे यासाठी  बनावट विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या १३० विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून त्यात बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना सदर विद्यापीठ हे बेकायदा आहे याची कुठलीही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी अजाणतेपणातून हे कृत्य केले आहे, असे असताना अधिकारी त्रासदायक पद्धतींचा वापर त्यांच्या विरोधात करीत आहेत, असे स्थलांतर विषयक वकिलांनी म्हटले आहे.

डेट्राइट येथील फेमिंगटन हिल्स येथे असलेल्या विद्यापीठाचा याच्याशी संबंध असून अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने यातील स्थलांतर घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. संघराज्य अभियोक्तयांनी यातील आरोपही जाहीर केले आहेत. राहण्यासाठी पैसे द्या अशा स्वरूपाचा हा घोटाळा असून काही विद्यार्थ्यांनी त्यांचा विद्यार्थी व्हिसा दर्जा कायम राहून अमेरिकेत निवास करण्याची संधी मिळावी यासाठी बोगस विद्यापीठात प्रवेश घेतला होता. स्थलांतर व सीमा शुल्क संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी छापे टाकून भारतीय किंवा भारतीय अमेरिकी मुलांना अटक केली असून आठ जणांवर गुन्हेगारी कट करून परदेशात फायदे लाटण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३० विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर नागरी स्थलांतराचा आरोप दाखल केला आहे. देशभरात हे छापे टाकले असून त्यात १३० परदेशी मुले सापडली आहेत, असे आयसीईच्या प्रवक्तया कॅरिसा कट्रेल यांनी सांगितले.

संख्या वाढण्याची शक्यता

घोटाळ्यातील विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून या विद्यार्थ्यांमध्ये भारतीयांचे प्रमाण अधिक आहे. अमेरिकेतील न्यूजर्सी, अ‍ॅटलांटा, ह्य़ूस्टन, मिशीगन, कॅलिफोर्निया, लुईझियाना, नॉर्थ  कॅरोलिना , सेंट लुईस येथे ही कारवाई करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन अटक करण्यात आली.

युनिव्हर्सिटी ऑफ फेमिंगट्न या विद्यापीठात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यात गैर काही नव्हते. त्यांना ते अधिकृत विद्यापीठ वाटले असेल तर तो त्यांचा दोष नाही.  – रवी मन्नन, स्थलांतर केलेल्या विद्यार्थ्यांचे वकील