भारतील जवान आणि चीनी सैनिकांत सिक्कीममधील नाकुला भागात २० जानेवारीला किरकोळ चकमक झाली. परंतु दोन्ही देशांच्या कमांडर पातळीवर हा पेच सोडवण्यात आला, अशी माहिती भारतील लष्कराने सोमवारी दिली.

काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार मात्र या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले आहेत. चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता, पण भारतीय लष्कराने त्यांना रोखले. त्यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांत किरकोळ चकमक झाली, असे उत्तर सिक्कीममध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या घटनांची माहिती असलेल्या नागरिकांनी सांगितले. नाकुला येथे गेल्या वर्षी ९ मे रोजी चकमक झाली होती. तेथेच या वेळी पुन्हा चकमक झाल्याचे सांगण्यात आले.

उत्तर सिक्कीमच्या नाकुला भागात २० जानेवारीला झालेली ही चकमक किरकोळ होती. त्यामुळे तो प्रश्न तेथेच कमांडर पातळीवर नियमानुसार सोडवण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आणि अतिरंजित वृत्ते देऊ नयेत, असे आवाहन लष्कराने केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी मात्र चकमकीच्या संदर्भात माहिती नसल्याचे स्पष्ट केले.

भारत-चीनमध्ये पूर्व लडाखमध्ये गेल्या ५ मे रोजी संघर्षांची पहिली ठिणगी पडली. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. तो सोडवण्यासाठी वरिष्ठ लष्करी अधिकारी पातळीवर आजपर्यंत चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी पूर्व लडाखमध्ये पँगॉग सरोवराच्या भागातही दोन्ही देशांच्या लष्करात चकमकी झाल्या होत्या.

भारत आणि चीन यांच्यात रविवारी कमांडर पातळीवरील चर्चेची नववी फेरी झाली. त्यात चीनने सैन्य माघारी घेण्याचा मुद्दा भारताने लावून धरला. पूर्व लडाखमध्ये संघर्ष सुरू असताना आता ३५०० किमीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने तैनात वाढवली आहे. प्रथम चीनने सैन्य माघारी सुरू करावी, असे भारताने म्हटले आहे. दोन्ही देशांचे एक लाख सैन्य सीमेवर तैनात आहे. राजनैतिक आणि लष्करी पातळीवरील चर्चेच्या फे ऱ्यात हा वाद मिटवण्यात अद्याप तरी यश आलेले नाही. यापूर्वी गलवान खोऱ्यात चीनच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते.

काय घडले?

चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय जवानांनी त्यांना रोखले. त्यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांत चकमक झाली. त्यात दोन्ही देशांचे काही सैनिक जखमी झाले. परंतु या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

१६ तास लष्करी चर्चा

भारत व चीन यांच्यातील लष्करी चर्चेची नववी फेरी सुमारे १६ तास चालली. यात पूर्व लडाखमधील संघर्षांच्या ठिकाणांवरून सैन्य माघारी घेण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली. मात्र चर्चेतून काय निष्पन्न झाले, हे अद्याप कळू शकलेले नाही. कॉर्प्स कमांडर स्तरावरील ही चर्चा रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरू होऊन मध्यरात्री अडीचच्या सुमारास संपली.