आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्य़ात महिला आणि तरुण युवतींवर इंजेक्शनच्या सहायाने (इंजेक्शन सायको) हल्ला करणाऱ्या एका मनोरुग्ण व्यक्तीबद्दल भीतीचे वातावरण पसरले आहे. या मनोरुग्णाने आतापर्यंत ११ महिलांवर हल्ला केला आहे.
पश्चिम गोदावरी जिल्ह्य़ातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये महिलांवर हल्ला करण्याचे ११ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सदर मनोरुग्ण महिलांवर इंजेक्शनने हल्ला करीत असल्याचे नरसापूरमचे पोलीस उपअधीक्षक सौम्या लता यांनी सांगितले.गेल्या आठवडय़ापासून जिल्ह्य़ात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या हल्लेखोराला पकडण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. या हल्लेखोराला पकडण्यासाठी ४० विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत, असे सौम्या लता यांनी सांगितले. सदर मनोरुग्ण इंजेक्शनच्या सहायाने पीडितांच्या शरीरात
काही घटक टोचतो आणि घटनास्थळावरून पसार होतो, असे आतापर्यंतच्या घटनांवरून आढळले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
यापैकी काही पीडितांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. सुई टोचल्याने झालेल्या जखमेवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र सुई टोचल्याच्या घटनेनंतर अन्य कोणत्याही आजाराने ते त्रस्त झालेले नाहीत, असेही पोलिसांनी सांगितले.