नवी दिल्ली : ‘एक देश-एक शिधापत्रिका’ योजना १ जून २०२० पर्यंत देशभरात पूर्णपणे लागू होईल, असे केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पास्वान यांनी सांगितले. तेलंगण-आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमध्ये शिधापत्रिकांच्या आंतरराज्य जोडणीची  सुरुवात शुक्रवारी करण्यात आली. याचा अर्थ तेलंगण व आंध्र प्रदेश येथे राहणारे शिधापत्रिकाधारक लोक दोन्ही राज्यात स्वस्त धान्य दुकानात खरेदी करू शकतील. तसेच महाराष्ट्र व गुजरात या राज्यातील लोक दोन्हीकडे स्वस्त धान्य दुकानातून खरेदी करू शकतील.

रामविलास पास्वान यांनी सांगितले की, आंतरराज्य शिधापत्रिका सेवा आम्ही सुरू केली आहे. हरयाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, पंजाब, राजस्थान, त्रिपुरा या राज्यांमध्ये या योजनेचे काम सुरू आहे.

अन्न खात्याचे सचिव रवीकांत यांनी सांगितले की, शिधापत्रिकांची आंतरराज्य व्यवस्था जानेवारी २०२० पर्यंतपूर्ण होईल अकरा राज्यात एकच संजाल असेल त्यात ११ राज्यातील लोक कुठूनही शिधा खरेदी करू शकतील. एक देश एक शिधापत्रिका योजना १ जून २०२० पर्यंत देशात लागू करण्याचा विचार आहे.

अन्नधान्याचा साठा कसा करणार असे विचारले असता पास्वान यांनी सांगितले की, भारतीय अन्नधान्य महामंडळाकडे भरपूर साठा आहे. त्यांना तीन महिन्यांचा साठा ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. ही गोदामे आता ऑनलाइन असून अन्नधान्याच्या वाहतुकीवर लक्ष ठेवलेले असते. आंतरराज्य शिधापत्रिका योजनेच्या अंमलबजावणीची अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी करणे आवश्यक आहे.

व्यक्तीमागे पाच किलो धान्य

सध्या सरकार माणसी पाच किलो अन्नधान्य अनुदानित दरात ८१ कोटी लोकांना देत आहे. देशात एकूण पाच लाख स्वस्तधान्य दुकाने असून त्यामुळे देशाच्या तिजोरीवर वार्षिक १.४ लाख कोटींचा भार पडत आहे. तांदूळ ३ रु. किलो, गहू २ रु. किलो, कडधान्ये १ रु. किलो दराने स्वस्त धान्य दुकानातून दिली जातात.