पाकिस्तानचे पंतप्रधान रझा परवेझ अश्रफ यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणारा ज्येष्ठ अधिकारी सरकारी निवासस्थानातच शुक्रवारी गूढरीत्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. पंतप्रधानांविरुद्धच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्यापासूनच तो प्रचंड दबावाखाली होता, अशी चर्चा आहे.
सदर अधिकाऱ्याचे नाव कामरान फैझल असे असून ते नॅशनल अकाऊण्टेबिलिटी ब्युरोचे (एनएबी) सहाय्यक संचालक होते. आपल्या निवासस्थानी पंख्याला लटकताना त्यांचा मृतदेह आढळला, असे पोलिसांनी सांगितले. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. त्यांचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. ऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पंतप्रधानांवर असून या प्रकरणाची चौकशी दोन अधिकारी करीत होते. फैझल हे त्यापैकीच एक अधिकारी होते.
पंतप्रधान आणि अन्य २० जणांवरील आरोपांबाबत कारवाई करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने एनएबीला दिला होता. अश्रफ हे ऊर्जामंत्री असताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने अश्रफ आणि अन्य संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले होते. मात्र पंतप्रधानांना अटक करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पुरावे नाहीत, असे एनएबीचे प्रमुख फसीह बोखारी यांनी न्यायालयास सांगितले.
फैझल यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच बोखारी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पाहणी केली. त्यांच्या मृत्यूचा प्रकार दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले. मात्र फैझल हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करताना प्रचंड दबावाखाली होते, असे एका वृत्तवाहिनीने आपल्या सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे. या प्रकरणाचे काम आपल्याकडून काढून घ्यावे, अशी विनंती फैझल यांनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांना केली होती, असेही सूत्रांनी सांगितले.