सौदी अरेबियातील तेल उत्पादन आस्थापनांवरील ड्रोन हल्ल्यात सामील असल्याचा अमेरिकेचा आरोप इराणने फेटाळला आहे. इराणविरोधात सुडाने कारवाई करण्यासाठी अमेरिका निमित्त शोधत असल्याचा उलट आरोपही इराणने या निमित्ताने केला.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्बास मौसवी यांनी सांगितले,की अमेरिकेने आंधळेपणाने केलेले हे आरोप निराधार असून ते अर्थहीन व समजण्यापलीकडे आहेत.

अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी इराणचा शनिवारी आरमको कंपनीच्या तेलक्षेत्रांवर केलेल्या हल्ल्यांबाबत निषेध करताना असे म्हटले होते,की ‘हल्ले  येमेनमधून करण्यात आलेल्याचे पुरावे नाहीत. या हल्ल्यांची जबाबदारी इराणचा पाठिंबा असलेल्या शिया हुथी बंडखोरांनी घेतली आहे. पॉम्पिओ यांना मात्र हा हल्ला हुथी बंडखोरांनी केल्याचे मान्य नाही.

मौसवी यांनी सांगितले, की अबाकिक व खुराइस या पूर्व भागातील तेल क्षेत्रांवर पहाटेच्या वेळी हल्ले करण्यात आले होते. ते इराणने केल्याचा आरोप अमेरिकेने केला असला तरी त्यात तथ्य नाही. इराणविरोधात कारवाईसाठी अमेरिका निमित्त शोधत आहे. अमेरिकेचे आरोप म्हणजे गुप्तचर यंत्रणांच्या मार्फत आमच्या देशाचे प्रतिमाहनन करण्याचा प्रकार आहे.  इराणविरोधात कुभांड रचून आगामी काळात कारवाई करण्याचा त्यांचा डाव आहे.

इराण व अमेरिका हे कट्टर शत्रू असून ते गेल्या मे महिन्यापासून संघर्षांच्या भूमिकेत आहेत.