अ‍ॅमेझॉनच्या पर्जन्यवनातील वणव्यांसंदर्भात जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन अपुरे पडत असल्याचा दावा पर्यावरण प्रेमींने केला आहे. तर दुसरीकडे ब्राझीलने परदेशातून ही आग विझवण्यासाठी देण्यात येणारी मदतही नाकारली आहे. अशातच आता एका कोकणी माणसाने ब्राझीलच्या आर्थिक नाड्या अवाळण्यासाठी कंबर कसली आहे. हा कोकणी माणूस म्हणजे आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर.

अॅमेझॉनच्या जंगलांना लागलेले वणवे विझवण्यासंदर्भात ब्राझील ठोस पावले उचलत नसल्यास आयर्लंड युरोपीयन राष्ट्र तसेच मर्कोसुर संघातील देशांबरोबरचा व्यापार पूर्णपणे बंद करण्यास तयार आहे, असं वराडकर यांनी जाहीर केलं आहे. वराडकर यांनी आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून जारी केलेल्या पत्रकामध्ये मर्कोसुर देशांबरोबरचा करार दोन वर्षांमध्ये संपुष्टात येणार असल्याचे नमूद केले आहे. ब्राझील अॅमेझॉनचे जंगल आणि पर्यावरण वाचवण्यासाठी काय पावले उचलतो यावर आयर्लंडकडून हा करार कायम ठेवायचा की नाही याबद्दल निर्णय घेतला जाईल असा अशाच वराडकर यांनी दिला आहे. मर्कोसुर देशांच्या संघटनेमध्ये अर्जेंटिना, ब्राझील, पराग्वे, उराग्वे आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश होतो. आयर्लंडने या देशांबरोबर व्यापार बंद केल्यास या देशांमधून आयर्लंडमध्ये निर्यात होणाऱ्या अनेक वस्तूंना मिळणारी बाजारपेठ बंद होईल.

‘आयर्लंड आणि इतर देशांमध्ये जेव्हा करार झाला होता त्यावेळी आयर्लंड आणि करार होणाऱ्या देशांकडून पर्यावर, कामागार आणि उत्पादनाच्या दर्जावर परिणाम होणार नाही अशी हमी देण्यात आली होती,’ अशी आठवण वराडकर यांनी या पत्रकामधून करुन दिली आहे. दरम्यान अॅमेझॉनमधील जंगलांमध्ये जागोजागी लागलेल्या वणव्यासाठी स्थानिक जबाबदार असल्याचे आरोप पर्यावरण प्रेमी आणि संशोधकांनी केले आहे. गुरांना चरण्यासाठी तसेच शेतीसाठी जमीन मोकळी करण्याच्या उद्देशाने स्थानिकांनी हे जंगल जाळल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, अॅमेझॉनच्या जंगलामध्ये लागलेली ही भीषण आग विझवण्यासाठी ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, अमेरिका या देशांचा समावेश असणाऱ्या ‘जी ७’ संघटनेने ब्राझीलला २० दशलक्ष युरोची (२२ दशलक्ष डॉलर्स) मदतही देऊ केली होती. मात्र ही मदत ब्राझीलने नाकारली आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी मदत घेण्यास नकार दिला आहे, असं वृत्त वृत्तसंस्था एएनआयने दिलं आहे. २० दशलक्ष युरोंच्या मदतीने अॅमेझॉनच्या जंगलामध्ये अग्निशमन विमाने पाठवण्याचा ‘जी ७’चा विचार होता. अ‍ॅमेझॉनचे साठ टक्के जंगल हे ब्राझीलमध्ये येते तर त्याचा उर्वरित भाग बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वेडोर, फ्रें च गयाना, पेरू, सुरीनाम, व्हेनेझुएला या देशात येतो.

कोण आहेत लिओ वराडकर

लिओ वराडकर यांची २०१७ साली आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. वराडकर हे मूळचे कोकणमधील मालवणचे आहेत. २०१७ साली झालेल्या आयर्लंडच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत वराडकर यांनी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला होता. वराडकर यांना ७३ पैकी ५१ मते मिळाली. वराडकर यांच्या विजयानंतर मूळ मालवणमध्ये त्यांच्या गावीही मोठा जल्लोष करण्यात आला होता. वयाच्या २२ व्या वर्षी राजकारणात पदार्पण करणारे लिओ २७ व्या वर्षी पहिल्यांदा संसदेत निवडून गेले. त्यानंतर २०११ ते २०१३ या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवलं. २०१४ ते २०१६ या काळात ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते. लिओ यांचे वडील अशोक वराडकर १९६० साली भारतातून इंग्लंडला गेले. ते तिथेच स्थायिक झाले. लिओ वराडकर यांचं कुटूंब मुळचं सिंधुदूर्गमधल्या वराड गावचं आहे. लिओ कधी आपल्या गावी आले नसले, तरी त्याचे आई वडील मात्र अधून मधून मूळगावी येत असतात. आजही लिओविषयी वराडमधील गावकऱ्यांना खूपच आपुलकी आहे.