पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सैन्य आमनेसामने आल्यानं मोठा तणाव निर्माण झाला आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरू असून, चर्चेतून शांततापूर्ण तोडगा काढण्यावर मंथन सुरू आहे. सीमेवरील तणावावरून भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी श्वेतपत्रिका काढण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. सीमेवरील परिस्थिती जैसे थे करण्यासाठी युद्धच पर्याय असून, भारत त्यासाठी तयार आहे का?, असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला केला आहे.

गलवान व्हॅलीतील रक्तरंजित लष्करी संघर्षापासून भारत-चीन सीमावाद उफाळून आला आहे. तेव्हापासून सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण असून, सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांच्या वतीनं चर्चा सुरू होती. मात्र, त्यातच चिनी सैन्यानं पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्याजवळ घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

आणखी वाचा- लडाख सीमावाद: भारत-चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये तब्बल १३ तासाची मॅरेथॉन बैठक

सीमेवर निर्माण झालेल्या स्थितीवरून सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केले आहेत. “सीमेवर चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षावर श्वेतपत्रिका काढण्यास काय अडचण आहे? पण सध्याची जी स्थिती आहे, ती नवीन परिस्थिती तयार होण्याच्या दिशेनं जात आहे. केवळ युद्धच योग्य पद्धतीनं परिस्थिती सुधारू शकते. त्यासाठी भारत तयार आहे का?,” असा सवाल स्वामी यांनी मोदी सरकारला केला आहे.

आणखी वाचा- संरक्षणमंत्र्यांनी संसदेत माहिती लपवणं बंद करावं; ओवेसींचा हल्लाबोल

गलवान व्हॅलीपासून सुरू असलेल्या संघर्षावरून विरोधकांनी मोदी सरकार अधिवेशनात घेरण्याचा प्रयत्न केला होता. सीमेवरील परिस्थितीसंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन केलं होतं. ज्यात ३८ हजार चौरस किमी भूप्रदेशावर चीननं कब्जा केला असल्याचं म्हटलं होतं.