इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री व नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक अमित शहा अधिकच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. या चकमकीत हात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांनी दूरध्वनीवरून केलेले संभाषण असलेले पेनड्राइव्ह सीबीआयने आरोपपत्रासोबत न्यायालयात दाखल केले आहे.
या चकमकीत हात असल्यावरून निलंबित झालेले पोलीस अधिकारी जी. एल. सिंघल यांनी शहा यांच्याशी झालेले व गुप्तपणे ध्वनीमुद्रित केलेले हे संभाषण सीबीआयच्या हवाली केले होते. हे संभाषण ऑगस्ट आणि सप्टेंबर २००९ मधील आहे. या संभाषणाचा तपशील मात्र आरोपपत्रात समाविष्ट केलेला नाही.
सिंघल यांनी दिलेल्या दुसऱ्या पेनड्राइव्हमध्ये नोव्हेंबर २०११ मध्ये नऊ पोलीस अधिकारी व काही कायदेतज्ज्ञ यांच्यात झालेल्या बैठकीचे ध्वनीमुद्रण आहे. इशरत जहाँ चकमकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईचा सामना कसा करावा आणि तपासात अडथळे कसे आणावेत, यावर त्या बैठकीत खल झाल्याचा सीबीआयचा दावा आहे. महाअधिवक्ता कमल त्रिवेदी, जी. एल. सिंघल, सिंघल यांचे वकील मित्र रोहित वर्मा, मुख्यमंत्र्यांचे सविच गिरिश मुरमु, पोलीस अधिकारी ए. के. शर्मा, गृहराज्यमंत्री प्रफुल्ल पटेल, कायदा राज्यमंत्री प्रदीपसिंह जाडेजा, माजी मंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा आणि तरुण बारोट हे त्या बैठकीत सहभागी होते.