आयसिस या दहशतवादी संघटनेकडून पॅरिसप्रमाणे लंडन, रोम आणि बर्लिन या ठिकाणी हल्ले होण्याची भीती आहे. आयसिसने प्रसिद्ध केलेल्या ध्वनिचित्रफितीत इंग्लंडची संसद, आयफेल टॉवर कोसळत असल्याचे दाखविण्यात आले आहे.

या ध्वनिचित्रफितीमध्ये पॅरिस आणि ब्रसेल्स आणि ९/११चे हल्ले म्हणजे सर्व जगाला इशारा होता, असे दाखविण्यात आले आहे. दहशतवादी हल्ले पॅरिसमध्ये झाले त्याप्रमाणे लंडन, बर्लिन किंव रोममध्ये होऊ शकतात. हा संदेश तुमच्यासाठी आहे. तुमच्याकडे पर्याय खूप कमी आहेत. त्यामुळे इस्लामचा स्वीकार करा, खंडणी द्या किंवा युद्धास तयार व्हा, अशी धमकी या ध्वनिचित्रफितीत देण्यात आली आहे.

पॅरिसवरील हल्ला म्हणजे युरोपसह जगभरातील देशांना हा इशारा होता, अरब शैलीप्रमाणे इंग्रजी भाषेत ही धमकी देण्यात आल्याचे ‘डेली एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी आयसिस पुन्हा हल्ल्याच्या तयारीत असल्याने सावध राहण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसांतच आयसिसने ही ध्वनिचित्रफीत प्रसारित केली आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या पॅरिस हल्ल्यात १३० जणांचा मृत्यू झाला होता.