इस्लामिक स्टेटमधील दहशतवाद्यांनी एक नवा व्हिडिओ प्रसारित केला असून, त्यात थेट ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि तेथील हाऊस ऑफ कॉमन्सचे सभापती जॉन बर्को यांनाच धमकावण्यात आले आहे. हा व्हिडिओ कधी तयार करण्यात आला याची माहिती मिळू शकलेली नाही.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यामध्ये ज्या दहशतवाद्यांनी सहभाग घेतला. त्या सर्वांची छायाचित्रे या व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक दाखविण्यात आली आहेत. पॅरिस हल्ल्याचा सूत्रधार अब्देलहमीद अबौद याला पॅरिस पोलिसांनी कंठस्नान घातले असले, तरी त्यालाही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ १७ मिनिटांचा असून, त्यामध्ये आयसिसकडून नागरिकांची कशी क्रूरपणे हत्या केली जाते, त्याचेही चित्रीकरण त्यामध्ये दाखविण्यात आले आहे.
जगात तुम्ही कुठेही जा, तुमची हत्या आम्ही कधीच थांबविणार नाही. तुम्ही पर्यटक म्हणून कुठे जात असला किंवा व्यावसायिक कारणाने जात असला तरी तुम्हाला आम्ही नक्कीच मारू, असे व्हिडिओतील एका भागामध्ये अबौद म्हणतो आहे, असे दाखविण्यात आले आहे.
या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना ब्रिटन सरकारचे प्रवक्ते म्हणाले, नव्याने प्रसारित करण्यात आलेल्या या व्हिडिओचा आम्ही तपास करीत आहोत. लोप पावत चालेल्या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलेला हा आणखी एक निरुपयोगी प्रयोग आहे.