गाझातील संघर्ष थांबवण्याबाबत इस्रायल व पॅलेस्टाईन यांच्या वाटाघाटीकर्त्यांमध्ये सोमवारी कैरो येथे झालेली अप्रत्यक्ष चर्चा निष्फळ ठरली. गाझामध्ये दोन हजार जण इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. हमासचे राज्य असलेल्या पॅलेस्टाईनबरोबरची ७२ तासांची शस्त्रसंधी संपुष्टात आल्यानंतर आता इजिप्तने पुन्हा मध्यस्थीचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे पुन्हा ७२ तासांची शस्त्रसंधी झाली आहे.  
इस्रायलच्या संरक्षण दलांनी सांगितले की, मध्यरात्रीनंतर हमासने एकही रॉकेट फेकलेले नाही. मध्यरात्रीपासून शस्त्रसंधी लागू झाली असून दोन्ही देशांनी केव्हाही शस्त्रसंधी तोडण्याचा इशारा दिला आहे.गाझा येथे अतिरेक्यांनी सांगितले की, शस्त्रसंधीपूर्वी आम्ही अनेक रॉकेट इस्रायलवर फेकले व इस्रायलने सायंकाळपासून अनेक हल्ले केले होते.
इस्रायलचा इशारा
इस्रायली सरकारचे प्रवक्ते मार्क रेगेव यांनी सांगितले की, हमासने शस्त्रसंधी तोडल्यास आम्ही नागरिकांचे संरक्षण करण्यास समर्थ आहोत. यापूर्वीची शस्त्रसंधी शुक्रवारी अमलात आली होती पण हमासने इस्रायलवर रॉकेट फेकल्याने ती संपुष्टात आली व इस्रायलनेही हवाई हल्ले केले होते.