भाजपच्या चाचेगिरीपासून गुजरातमधील काँग्रेस आमदारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेले कर्नाटकचे उर्जामंत्री डीके शिवकुमार यांच्या घरातून प्राप्तिकर खात्याने सुमारे ११ कोटी ४३ लाख रुपयांची रोकड जप्त केली. यातील सात कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड दिल्लीतील निवासस्थानातून जप्त करण्यात आल्याचे समजते.

गुजरात राज्यसभा निवडणुकीतील तिसऱ्या जागेसाठी भाजपने बलवंतसिह राजपूत यांना उमेदवारी दिली आहे. राजपूत हे या निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसमधून भाजपत आले. राजपूत यांच्यामुळे सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. गुजरातमधील काँग्रेसचे ५७ पैकी सहा आमदार भाजपसोबत आहे. उर्वरित ५१ पैकी ४४ आमदारांना काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये हलवण्यात आले आहे. कर्नाटकचे उर्जामंत्री डीके शिवकुमार यांच्या बंगळुरुजवळील ‘इगलटन गोल्फ रिसोर्ट’मध्ये हे आमदार बंदिस्त आहेत.

२५१ कोटी रुपयांचे मालक असलेले शिवकुमार हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत मंत्री असून प्राप्तिकर खात्याची आधीपासूनच त्यांच्यावर नजर होती. बुधवारी सकाळी प्राप्तिकर खात्याने काँग्रेस आमदार थांबलेल्या ‘इगलटन गोल्फ रिसॉर्ट’वर छापा टाकला. शिवकुमार यांच्या दिल्ली आणि कर्नाटकमधील सुमारे ६० हून अधिक मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईच्या वेळेवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. बुधवारी काँग्रेसने राज्यसभा आणि लोकसभेत या कारवाईवरुन जाब विचारला होता. तर अरुण जेटलींनी प्राप्तिकर विभागाच्या कारवाईचा राज्यसभा निवडणुकीशी संबंध नाही असे त्यांनी सांगितले होते.

गुरुवारीदेखील प्राप्तिकर विभागाने शिवकुमार आणि त्याच्या निकटवर्तीयांवर कारवाई सुरुच ठेवली. गुरुवारी प्राप्तिकर खात्याने महत्त्वाची कागदपत्र आणि अकाऊंट बूक जप्त केले. शिवकुमार यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून सुमारे ८ कोटी ३३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तर बंगळुरुमधून २ कोटी ५० लाख आणि मैसूरमधून ६० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने दिली. शिवकुमार यांच्याकडून आत्तापर्यंत ११ कोटी ४३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून अजूनही छापेमारी सुरु आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.