करोनावरील लस आल्यानंतरही तोंडाला मास्क लावणं गरजेचं आहे, असं मत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं आहे. डीडी या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. मास्क लावणं आणि हात धुणं हे आपल्यासाठी सर्वाधिक गरजेचं असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
कोरोना के खिलाफ़ मास्क सबसे बड़ा रामबाण है। #vaccine आने के बाद भी मास्क लगाना ज़रूरी है।
मास्क लगाना और हाथों की सफ़ाई यह हमारे लिए बहुत आवश्यक है।
@PMOIndia #COVID19 #Unite2FightCorona pic.twitter.com/ys1gA2PiQv— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) December 19, 2020
डॉ. हर्षवर्धन म्हणाले, “लस आल्यानंतरही तोंडाला मास्क लावणं हा सर्वात मोठा रामबाण उपाय आहे. लस किती काळापर्यंत आपल्याला सुरक्षा देईल हे येणाऱ्या काळातच निश्चित होईल. त्यामुळे मास्क लावणं तर सर्वात सोप आहे. म्हणून मास्क लावणं आणि हाताच्या स्वच्छतेवर लक्ष देणं हे आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. जर समजा लस आलीच नसती तरी आपल्याला हे करणं गरजेचंच होतं. त्यामुळे स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क लावायला कधीही विसरु नका.”
देशात करोना लसीकरण ऐच्छिक
कोविड १९ प्रतिबंधक लस घेणे हे हितकारक आहे. जरी आधी कोविड १९ चा संसर्ग होऊन गेला असेल तरी ठरावीक मुदतीत या लशीच्या दोन मात्रा घेणे लोकांच्या हिताचे राहील. कोविड १९ लसीची कुणावर सक्ती केली जाणार नाही. पण लस घेतलेले केव्हाही चांगले असेल. ती अर्धवट मात्रेत घेऊ नये तर पूर्ण दोन मात्रा घेतल्या जाव्यात. त्यामुळे त्या व्यक्तीचे करोनापासून संरक्षण होईल व इतरांनाही त्याची बाधा होणार नाही. कुटुंबीय, मित्र, नातेवाईक, सहकर्मचारी यांना संरक्षण मिळेल, असं नुकतचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
भारतात तयार होत आहेत सहा लस
देशातील लशीच्या चाचण्या वेगवेगळ्या पातळ्यांवर असून भारतातील पहिली लस लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. सहा लसी भारतात तयार होत असून यामध्ये आयसीएमआर व भारत बायोटेक यांची कोव्हॅक्सिन, झायडस कॅडिलाची झायकोव्ह डी, जिनोव्हाची एमआरएनए लस, सीरमची कोविशिल्ड, हैदराबादची डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज तयार करीत असलेली रशियाची स्पुटनिक ५ या लसींचा समावेश आहे. सहावी लस हैदराबादमधील बायोलॉजिकल इ. लि. ही कंपनी तयार करीत असून ती अमेरिकेतील एमआयटी या संस्थेच्या सहकार्याने विकसित केली जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 19, 2020 6:02 pm