राष्ट्रपिता महात्मा गांधी हे साबरमती येथील संत होते, त्यांची जीवनशैली अत्यंत साधी होती, तर दुसरीकडे मोदी आता साबरमतीचे महंत असून ते १० लाख रुपये किमतीचा सूट परिधान करतात, अशी टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
भाजप सरकारचे भूसंपादन विधेयक शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करून त्याविरुद्ध सोमवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्या वेळी रमेश बोलत होते. या वेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चकमक उडाली.
जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि पाण्याचे फवारेही मारले. त्यामध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंग ब्रार यांच्यासह अनेक कार्यकर्ते जखमी झाले. संसदेच्या दिशेने कूच करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जंतरमंतर येथे उभारण्यात आलेले कडे तोडण्याचा प्रयत्न केला.
जंतरमंतर येथे जमलेल्या कार्यकर्त्यांसमोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, जयराम रमेश, अंबिका सोनी, अहमद पटेल यांची भाषणे झाली.