भारतात अशांतता पसरवण्याच्या इराद्याने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरची तुरूंगातून सुटका केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या तुरूंगातून गुपचूप मसूद अजहरची सुटका करण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला दिली आहे. परिणामी, पाकिस्तान पुन्हा एकदा मसूद अझहरचा वापर भारताविरोधात दहशतवादी हल्ल्यासाठी करण्याची शक्यता आहे. त्याच्या सुटकेनंतर पाकिस्तानने राजस्थान सीमेवर अतिरिक्त सैन्यही तैनात केले असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. हिंदुस्थान टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानने मसूद अजहर याच्यासह अन्य एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचीही तुरुंगातून गुपचूप सुटका केल्याचं वृत्त आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्याविरोधात पाकिस्तान येणाऱ्या काळात सियालकोट-जम्मू आणि राजस्थान सेक्टरमध्ये  दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. याशिवाय पाकिस्तानने राजस्थानच्या सीमावर्ती भागात अतिरिक्त सैन्य तैनात केल्याचीची माहिती गुप्तचर विभागानं सीमा सुरक्षा दलाला दिली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी सरकारला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मसूद अझहर हा 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले होते. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीमा सुरक्षा दल आणि लष्कराच्या जवानांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या संभाव्य कारवायांबाबत सतर्कही केलं आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.