‘जामिया’च्या निदर्शकांवरील गोळीबार

नवी दिल्ली : जामियाच्या विद्यार्थ्यांवर ज्या १७ वर्षीय युवकाने गोळीबार केला त्या युवकाला त्याच्या पालकांनी नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी नवे कपडे शिवण्यासाठी १० हजार रुपये दिले होते, मात्र या युवकाने त्या पैशातून त्याच्याच गावात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाकडून बंदूक खरेदी केल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. त्याचप्रमाणे समाज माध्यमांवरून तिरस्कार पसरविणारा मजकूर वाचून युवकाच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली आणि त्यातूनच त्याने गुरुवारी गोळीबार केला, असेही चौकशीतून समोर आले आहे.

दरम्यान, जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळ शांततेत निदर्शने केली. गर्दीतून एक युवक पुढे येतो आणि कडक पोलीस बंदोबस्त असतानाही गोळीबार करतो हा प्रकार धक्कादायक असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.