नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनावेळी विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या प्रवेशाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी विनंती जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने मनुष्यबळ विकास मंत्रालयास सादर केलेल्या नवीन अहवालात केली आहे. विद्यापीठाने या आधी १५ व १६ डिसेंबर दरम्यान झालेल्या घटनांबाबत आधीच एक अहवाल सादर केला होता.

नवीन अहवाल २० डिसेंबर रोजी सादर करण्यात आला असून त्यात असे म्हटले आहे की, या प्रकरणी समिती नेमून न्यायालयीन चौकशी करावी.

विद्यापीठाने म्हटले आहे की, पोलिसांनी अश्रुधूर व लाठीमाराचा वापर केला. त्यावेळी निदर्शक मथुरा रोड व जुलेना रोड येथे जमले होते त्यांना पांगवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली होती. निदर्शक परत जात असताना ते मौलाना महंमद अली जौहर मार्गावर होते तो रस्ता विद्यापीठाच्या आवारातून जातो. पोलिसांनी १५ डिसेंबर रोजी  विद्यापीठाच्या ग्रंथालयात घुसून बाहेरील कुणी व्यक्ती आहेत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

जमावाचा पाठलाग करताना पोलीस विद्यापीठ आवारात द्वार क्रमांक ४ व द्वार क्रमांक ७ मधून आत आले. त्यांनी कुलूपही तोडले. रक्षकांना मारहाण केली. वाचनालयाची दारे व काचा फोडल्या. ग्रंथालयातील  सर्व विद्यार्थ्यांना मारहाण केली. वाचनकक्षात अश्रुधुराची नळकांडी फोडली. विद्यापीठ आवार व ग्रंथालय येथे प्रवेशाची परवानगी विद्यापीठ अधिकाऱ्यांनी दिली नसतानाही पोलीस आत घुसले. विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. न्यू फ्रेंड्स कॉलनी व कालकाजी पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्यात आले. पोलिसांनी विद्यापीठात केलेल्या प्रवेशाची बेकायदा चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात यावी, असे विद्यापीठाने म्हटले आहे.

पाकिस्तानी निर्वासितांकडून मोदी सरकारचे कौतुक

इंदूर : पाकिस्तानातून येऊन मध्य प्रदेशात राहणाऱ्या अनेक हिंदू निर्वासितांनी इंदूरमध्ये रविवारी आयोजित केलेल्या ‘आभारप्रदर्शन’ कार्यक्रमात, सुधारित नागरिकत्व कायदा केल्याबद्दल नरेंद्र मोदी सरकारचे कौतुक केले. याच कार्यक्रमात त्यांनी भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा सत्कारही केला. यापैकी अनेक लोकांनी पाकिस्तानात बळजबरीचे धर्मातर आणि मुली व महिलांवरील बलात्कारासह झालेल्या त्यांच्या धार्मिक छळाच्या कहाण्या सांगितल्या. या दु:खद आठवणी सांगताना त्यांच्यापैकी अनेकांना स्वत:चे अश्रू आवरता आले नाहीत. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे त्यांना लवकरात लवकर भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचा उल्लेख या लोकांनी केला.