जम्मू, काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश हे भारताचे अंतर्गत भाग होते, आहेत आणि कायम राहतील, असे भारताने गुरुवारी स्पष्ट केले आणि चीनला भारताच्या अंतर्गत बाबींसंदर्भात भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही भारताने ठणकावले.

लडाख या केंद्रशासित प्रदेशाला त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेश या राज्याला आमची मान्यता नसल्याचे चीनने म्हटले होते त्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी वरील बाब स्पष्ट केली.

जम्मू, काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश हे भारताचे अंतर्गत भाग होते, आहेत आणि काम राहतील ही भारताची स्पष्ट आणि कायम भूमिका आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.

चर्चा सुरू -जयशंकर

* पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे, मात्र काय सुरू आहे ती दोन्ही देशांमधील गोपनीय बाब आहे, असे गुरुवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.

* दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे आणि काम प्रगतिपथावर आहे, असे जयशंकर यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील चर्चेचे फलित काय, असा प्रश्न त्यांना ऑनलाइन विचारण्यात आला होता.

* सीमेवरील स्थिती सुस्पष्ट करावी असा आग्रह धरण्यात आला तेव्हा जयशंकर यांनी, चर्चा सुरू आहे, मात्र जी चर्चा सुरू आहे ती दोन्ही देशांमधील गोपनीय बाब आहे, असे सांगितले. सध्या आपण जाहीर भाष्य करण्यासारखी स्थिती नाही, त्याबाबत पूर्वानुमान काढले जावे असे आपल्याला वाटत नाही, असेही जयशंकर म्हणाले.