तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर जगभरातून अफगाणी नागरिकांच्या हक्क आणि अधिकारांविषयी चिंता व्यक्त केली जातीये. अफगाण मुली आणि स्त्रियांचे हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतले जात असून इथल्या संघर्षाची सर्वाधिक किंमत येथील निष्पाप नागरिकांना मोजावी लागत आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमधील संकटावर ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि बांगलादेशी लेखिका तस्लिमा नासरीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जावेद अख्तर यांनी अमेरिका ही कोणत्या प्रकारची महाशक्ती असल्याचं म्हणत निशाणा साधलाय. तर, अफगाणिस्तानमध्ये येत्या काळात महिला केवळ लैंगिक गुलाम आणि मुलं जन्माला घालण्यापुरत्याच उरतील, अशी भीती तस्लिमा नासरीन यांनी व्यक्त केली आहे.

“अमेरिका जर तालिबान नावाच्या या रानटी लोकांचा नायनाट करू शकत नसेल तर ते कोणत्या प्रकारची महाशक्ती आहेत? तसेच हे जग कोणत्या प्रकारचं आहे ज्यांनी अफगाण स्त्रियांना दया नसलेल्या धर्मांधांच्या भरवशावर सोडलंय. मानवाधिकारांचे रक्षणकर्ते असल्याचा दावा करणाऱ्या सर्व पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे.” असं जावेद अख्तर यांनी म्हटलंय. त्यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली असून तुम्ही कोणत्या प्रकारची महाशक्ती आहात, असा प्रश्न उपस्थित केलाय. तसेच अफगाणी स्त्रियांच्या हक्काबाबतही विचारणा केली असून मानवाधिकारांचे रक्षणकर्ते म्हणवणाऱ्या पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे, असं सुनावलं आहे.

तस्लिमा नसरीन म्हणाल्या, “तालिबान अफगाणी महिलांना नष्ट करत आहेत. यापुढे तिथं कुठेही महिला दिसणार नाहीत. महिला केवळ लैंगिक गुलाम आणि मूल जन्माला घालणारी मशीन म्हणून घरीच राहतील. कट्टरतावादी तालिबानच्या राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होईल,” असं मत नासरीन यांनी व्यक्त केलं आहे.

नोबेल विजेत्या मलालाने व्यक्त केली चिंता..

शांततेसाठी नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझईने देखील अफगाणिस्तानच्या परिस्थितीबद्दल विशेषतः महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिने जागतिक नेत्यांनी एकत्र येत अफगाणिस्तानच्या मदतीसाठी पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. “हे एक मानवीय संकट असून आपण अफगाणी नागरिकांना मदत करणे आणि पाठिंबा देणे आवश्यक आहे. मी अनेक जागतिक नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे,” असं मलालाने म्हटलंय.