पश्चिम आफ्रिकेतील मालीची राजधानी बमाकोमधील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये कट्टरपंथीय बंदुकधाऱ्यांनी धुमाकूळ घातला असून त्यांनी ओलीस ठेवलेल्या पर्यटकांपैकी ८० जणांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर, गोळीबारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.

दहशतवाद्यांनी हॉटेलमधील एकूण १७० पर्यटकांना ओलीस ठेवले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी आणि सुरक्षारक्षकांनी सांगितले आहे. तर, ओलीसांमध्ये २० भारतीय पर्यटकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी हॉटेलभोवती वेढा दिला असून, ओलीसांना सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मालीमधील प्रमाणवेळेनुसार सकाळच्यावेळी हा हल्ला करण्यात आला. हॉटेलमधील सातव्या मजल्यावर गोळीबाराला सुरुवात झाली. त्यानंतर हॉटेलमधील सुरक्षारक्षकांनी कट्टरपंथीयांना प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. हॉटेलमधील पर्यटकांना ओलीस ठेवण्यासाठीच गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षारक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलमध्ये सुमारे १० बंदुकधारी आहेत. एकूण १७० लोकांना ओलीस ठेवण्यात आले असल्याचे हॉटेलच्या व्यवस्थापकाने सांगितले. पोलीस आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरू आहे.