सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी दुतावासात येताच गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली. एवढंच नाही तर खाशोगी यांच्या मृतदेहाचे तुकडे करणेही हादेखील कटाचाच एक भाग होता अशी माहिती तुर्कस्तानचे चीफ प्रॉसिक्यूटर इफरान फिदान यांनी दिली आहे. अमेरिका स्थित पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या करण्यात आल्याचे सौदी अरेबियाने आधीच मान्य केले आहे. आता ते दुतावासात आले तेव्हाच त्यांना मारून टाकण्यात आले आणि त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करणं हा कटाचाच भाग होता असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अमेरिकेत वास्तव्यास असलेले सौदी अरेबियाचे पत्रकार, सौदी राजवटीवरील टीकाकाकर जमाल खाशोगी हे ३० दिवसांपूर्वी तुर्कस्तानमधील सौदी अरेबियाच्या दुतावासात गेले होते. तिथेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. खाशोगी हे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे आखाती राजकारणविषयक स्तंभलेखक/पत्रकार होते. सौदी राजवटीवर त्यांनी अनेकदा टीका केली होती.

सौदी अरेबियात प्रतिष्ठेची आर्थिक परिषद असताही त्या परिषदेवर खाशोगी खून प्रकरणाची छाया होती. या परिषदेत सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी खाशोगी यांच्या मृत्यूसंदर्भात भाष्य केले. ‘खाशोगी यांची हत्या ही निंदनीय आणि घृणास्पद घटना आहे. सौदीतील प्रत्येकासाठी ही एक दु:खद घटना आहे. सौदी अरेबिया खाशोगी यांच्या हत्येचा सखोल तपास करण्यात येईल आणि दोषींना न्यायालयात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. अशात आता तुर्कस्तानचे चीफ प्रॉसिक्यूटर इफरान फिदान यांनी खाशोगींची हत्या कट करून करण्यात आली असे म्हटले आहे.