अफगाणिस्तानात काबूलमध्ये बुधवारी शिखांच्या प्रार्थनास्थळावर हल्ला झाला. गुरुद्वारावर झालेल्या या हल्ल्यामध्ये केरळमधल्या एकाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. इस्लामिक स्टेटच्या तीन आत्मघातकी हल्लेखोरांपैकी एकाची ओळख केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी  पटवली आहे. त्याचे नाव मोहम्मद मुहसीन आहे.

मोहम्मद मुहसीन केरळमधील कन्नूर येथे राहणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. या हल्ल्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. इस्लामिक स्टेटचे मॅगझिन अल नाबामध्ये शुक्रवारी तीन आत्मघातकी हल्लेखोरांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला. त्यात अबू खालिद अल हिंदीला त्याच्या आई-वडिलांनी ओळखले. त्याचे मूळ नाव मोहम्मद मुहसीन आहे.

गुरुद्वारावरील हल्ला हा काश्मीरचा बदला असल्याचेही इसिसशी संबंधित असलेल्या अमाक वृत्त संस्थेने म्हटले होते. केंद्रीय यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मोहम्मद मुहसीन आहेत. जे केरळमधून इसिसमध्ये भरती झाले आहेत. जुलै २०१९ मध्ये अमेरिकेच्या एअरस्ट्राइकमध्ये त्यातला एक जण ठार झाला होता. तो मुहसीन इंजिनिअरींगमध्ये पदवीधर होता. तो २०१७ मध्ये इसिसमध्ये भरती झाला होता.

या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात
गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली असली तरी त्यामागे हक्कानी नेटवर्क आणि लष्कर-ए-तोयबा असल्याचे भारतीय आणि पाश्चिमात्य गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. या हल्ल्यामध्ये २८ भाविकांचा मृत्यू झाला. आठ जण जखमी झाले. गोळीबार सुरु असताना ८५ जणांची सुटका करण्यात आली. भारतीय दूतावासापासून तीन किलोमीटर अंतरावर हा गुरुद्वारा आहे.

पाकिस्तानच्यावतीने तालिबानच्या क्वेटा शुराने या हल्ल्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानातून भारताला बाहेर काढण्याच्या उद्देश या हल्ल्यामागे होता. पाकिस्तानच्या ISI चा या हल्ल्यामध्ये सहभाग असून त्यांनी ‘ऑपरेशन ब्लॅकस्टार’ नाव दिले होते. पाकिस्तान नेहमीच हक्कानी नेटवर्कचा वापर करत आला आहे. तालिबानचा डेप्युटी कमांडर सिराजुद्दीनकडे हक्कानी नेटवर्कचे नेतृत्व आहे.