हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची लखनऊ शहरात हत्या करण्यात आली. या घटनेनं उत्तर प्रदेशात प्रचंड खळबळ उडाली. उत्तर प्रदेश पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात गुजरात एटीएसनं मंगळवारी मुख्य संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांनी या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबूली दिली असून, अशफाक शेख याने बदला घेण्यासाठी रोहित सोळंकी असं नावं धारण केलं होतं, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हिंदू महासभेचे कार्याध्यक्ष असलेल्या कमलेश तिवारी यांनी २०१७मध्ये हिंदू समाज पक्षाची स्थापना केली. त्यापूर्वी २०१५मध्ये एका भाषणात त्यांनी पैगंबराविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. या वक्तव्याचा बदला घेण्यासाठीचं त्यांची हत्या करण्यात आल्याचं तपासातून समोरं आलं आहे. गुजरात एटीएसनं गुजरात-राजस्थानच्या सीमेवर दोन मुख्य संशयितांना अटक केली. त्यांनी हत्येमध्ये सहभाग असल्याची कबूली दिली आहे. अशफाक हुसेन जाकीर हुसेन शेख (३४) आणि फरीद उर्फ मोईनुद्दीन कुर्शिद पठाण (२७) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

एटीएसनं केलेल्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी अशफाक शेख हा मुंबईस्थित असलेल्या एका औषधीनिर्माण कंपनीसाठी मेडिकल रिप्रेझेटेटीव्ह म्हणून काम करतो. त्याच कंपनीत त्याच्यासोबत रोहित सोळंकी नावाचा कर्मचारी होता. त्याच्याच नावानं अशफाकनं आधार ओळखपत्र तयार केलं होतं. रोहित सोळंकी अशी ओळख सांगून त्यांनं हिंदू समाज पार्टीत प्रवेश केला होता, असं तपासातून समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं गुजरात एटीएस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाल्यानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे आरोपी.

मिठाईच्या बॉक्समुळे लागला शोध –

कमलेश तिवारी यांची हत्या झाली त्या दिवशी अशफाक शेख आणि मोइनुद्दीन यांनी तिवारी यांच्या घरातच असलेल्या कार्यालयात आले. यावेळी त्यांनी सोबत मिठाई आणली होती. मिठाईच्या बॉक्सवर गुजरातमधील सुरतच्या दुकानाचं नाव होतं. कमलेश यांच्यावर गोळी झाडून तसेच धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून आरोपी पसार झाले. मात्र, मिठाईचा बॉक्स तिथेच राहिला. त्यामुळे आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं. मिठाईच्या बॉक्सवरील पत्त्याआधारे तपास करून तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दरम्यान, दोन्ही आरोपींनी पैशांची उधळपट्टी केल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांकडे मदत मागितली होती. त्यामुळे गुजरात एटीएसनं त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांवर पाळत ठेवली होती. कारवाई करण्यासारखी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली, असं गुजरात एटीएसनं म्हटलं आहे.