बिहारमधील बेगुसराई मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. डाव्या आघाडीचे ते संयुक्त उमेदवार असतील. विशेष म्हणजे शुक्रवारी राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस तसेच इतर मित्रपक्षांनी महाआघाडीची घोषणा केली होती. त्यात डाव्या पक्षांना केवळ एकच जागा सोडण्यात आली आहे. त्यात बेगुसराई मतदारसंघ राष्ट्रीय जनता दलाच्या वाटय़ाला आला आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत अपेक्षित आहे.

बेगुसराईमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय जनता दल तन्वीर हसन यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराकडून त्यांचा साठ हजार मतांनी पराभव झाला होता.

भाकपची टीका

विरोधी नेते जागावाटपात मात्र तितकेसे लवचीक नाहीत असा आरोप भाकप सरचिटणीस एस. सुधाकर रेड्डी यांनी केला आहे. हे नेते भाजपविरोधी आहेत, पण जागांचा त्याग करण्यास तयार नाहीत असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होते अशी टीका त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केली. सप, बसप तसेच राजद हे प्रादेशिक पक्षदेखील जागावाटप चर्चा अयशस्वी होण्यास जबाबदार असल्याचा आरोप रेड्डी यांनी केला. विशाल दृष्टिकोनाच्या अभावामुळे हे होत आहे. पश्चिम बंगालमध्ये आम्ही काँग्रेसला १२ जागा देऊ केल्या होत्या. मात्र त्यांची १७ जागांची मागणी होती. तर बिहारमध्ये लालूप्रसाद यांच्याशी आमची आघाडी होती. मात्र आता त्यांच्या मुलाला कुणी काय संदेश दिला हे ठाऊक नाही, मात्र आम्ही स्वबळावर लढू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.