पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये ‘रसगुल्ला’ मिठाईवरुन सुरु असलेला वाद नुकताच संपला असताना आता आणखी एक वाद समोर आला आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू ही दोन्ही राज्ये ‘म्हैसूर पाका’वरुन आमनेसामने आली आहेत. म्हैसूर पाकाचा शोध आपल्याच राज्यात लागला, असा या दोन्ही राज्यांचा दावा आहे. दक्षिण भारतात अतिशय लोकप्रिय असलेल्या ‘म्हैसूर पाका’ची भौगोलिक ओळख (जिओग्राफिकल आयडेन्टिकेशन) मिळवण्यासाठी ही दोन्ही राज्ये एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत.

मंगळवारीच रसगुल्ल्यावरुन बऱ्याच कालावधीपासून पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये सुरु असलेला संघर्ष संपला. या वादात पश्चिम बंगालची सरशी झाली. यानंतर आता म्हैसूर पाकावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. म्हैसूर पाकचा शोध नेमका कुठे लागला?, या पदार्थाला म्हैसूर (कर्नाटकचे जुने नाव) या ठिकाणावरुन नाव देण्यात आले का?, की हा पदार्थ तामिळनाडूमधून आला?, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. १८५३ मध्ये लॉर्ड मॅकेले यांनी भारतीय संसदेत बोलताना म्हैसूर पाकाचा उल्लेख केला होता. त्यामुळेच म्हैसूर पाकाचा शोध तामिळनाडूमध्येच लागला, असा दावा तामिळनाडूने केला आहे.

संसदेत २ फेब्रुवारी १८५३ रोजी भाषण करताना लॉर्ड मॅकेले यांनी म्हैसूर पाकाचा उल्लेख केला होता. ‘तुम्ही लोक यावर विश्वास ठेवणार नाही. मात्र, म्हैसूर पाकाचा शोध एका मद्रासी व्यक्तीने लावला होता. बंगळुरुतील माझ्या एका मित्राने याबद्दलची माहिती मला दिली होती. तामिळ लोक मद्रासमध्ये म्हैसूर पाक बनवतात. ७४ वर्षांपूर्वी म्हैसूर पॅलेसमधील एका वकिलाने म्हैसूर पाकाची कृती चोरली होती. त्याने मरण्याआधी म्हैसूरच्या राजाला पाककृती सांगितली. त्यामुळे म्हैसूरच्या राजाने त्या खाद्यपदार्थाला म्हैसूर पाक असे नाव दिले,’ असे मॅकेले यांनी म्हटले होते.

कर्नाटकच्या लोकांनी मात्र तामिळनाडूतील जनतेचा दावा खोडून काढला आहे. मिठाईच्या नावावरुनच हा पदार्थ म्हैसूरमध्ये बनवण्यात आल्याचे स्पष्ट होते, असा दावा कर्नाटकने केला. त्यामुळे आता या वादात नेमकी कोणाची सरशी होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.