नवी दिल्ली : जम्मू काश्मीर बाबत भारताच्या भूमिकेला रशियाने भारताला पाठिंबा दिला असून तो भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न असल्याचे म्हटले आहे.

रशियाचे राजदूत निकोलाय कुदाशेव यांनी शुक्रवारी रशियाची ही भूमिका स्पष्ट केली. रशियाचे उप राजदूत रोमन बाबुशकिन यांनी सांगितले, की रशिया भारताला हवाई संरक्षणासाठी  २०२५ पर्यंत ‘एस ४००’ या क्षेपणास्त्र प्रणालीचे सर्व घटक देण्याची प्रक्रिया पूर्ण करील. एस ४०० क्षेपणास्त्रे देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे २२ व २३ मार्च रोजी रशियाचा दौरा करणार असून ते रशिया-चीन यांच्यासमवेतच्या त्रिपक्षीय बैठकीस उपस्थित राहणार आहेत. जम्मू काश्मीरभेटीसाठी जे राजदूत गेले होते त्यात रशियाच्या राजदूतांना निमंत्रण देण्यात आले नव्हते, त्यावर त्यांनी सांगितले,की काश्मीरबाबत भारताच्या भूमिकेवर ज्यांना शंका आहे ते तेथे गेले. आम्हाला भारताच्या भूमिकेवर कुठलीही  शंका नाही.

सुरक्षा मंडळात चीनने काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचा जो प्रयत्न केला त्यावर विचारले असता ते म्हणाले, की काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय असून शिमला करार व लाहोर कराराच्या चौकटीतच त्यावर चर्चा करण्यात यावी. एस ४०० क्षेपणास्त्रे ही एस ३० क्षेपणास्त्रांचे सुधारित रूप असून ती आधी रशियन संरक्षण दलात तैनात करण्यात आली. या क्षेपणास्त्रांचे उत्पादन अलमाझ अँटे यांनी केले असून २००७ पासून ती रशियाच्या सेवेत आहेत.