कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास केंद्र सरकारकडून सुरूवात झाली आहे. खोऱ्यात केवळ दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आलीये पण मोबाइल आणि इंटरनेट सेवांवर बंदी अद्याप कायम आहे. इंटरनेट सेवा बंद असतानाही फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी यांची इंटरनेट सेवा मात्र सुरूच होती, असं समोर आलं आहे.

सय्यद अली शाह गिलानी यांनी केलेल्या एका ट्विटमुळेच ही बाब लक्षात आली. परिणामी, इंटरनेट सेवा बंद असतानाही हुर्रियतच्या गिलानी यांना इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पाच ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या आधीच म्हणजे चार ऑगस्ट रोजीच संपूर्ण जम्मू-काश्मीरमधून इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा बंद करण्यात आली होती. सगळ्या खोऱ्यात इंटरनेट सेवा बंद असताना हुर्रियतचे नेता सय्यद अली शाह गिलानीं यांचं इंटरनेट मात्र सुरूच होतं. पण आठ ऑगस्ट रोजी गिलानी यांनी कलम 370 च्या विरोधातील एक ट्विट केलं आणि सगळेच हैराण झाले. इंटरनेट सेवा बंद असतानाही गिलानी यांचं ट्विट समोर आल्याने याबाबत चौकशीला सुरूवात झाली. त्यानंतर बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांमुळे गिलानी यांना विशेष इंटरनेट सेवा मिळाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.