गेल्या काही दिवसांपासून ध्रुवीय वाऱयांनी आणलेल्या थंडीने सध्या अमेरिकेत हाहाकार उडाला आहे. यात ही महाभयंकर थंडी पोलिसांच्या मदतीची ठरेल अशीच एक घटना अमेरिकेत घडली. पोलीस ठाण्यातून फरार झालेल्या एका कैद्याने थंडीमुळे गारठल्याने चक्क पोलिसांना शरण जाण्याचा पर्याय स्वीकारला.
या फरार कैद्याने एका हॉटेलमधून तुरुंग प्रशासनाला फोन करून आपल्याला येथून घेऊन जा असे सांगितले.
अमेरिका @ उणे ५२!
अमेरिकेतील केंटुकी येथील लेक्सिंग्टन तुरुंगातून रॉबर्ट विक (४२) हा कैदी फरार झाला होता. तरुंग प्रशासनाकडून झालेल्या हलगर्जीपणाचा फायदा उचलत रॉबर्टने तेथून पळ ठोकला. कैदी कपड्यांमध्येच तरुंगातून फरार झाल्याने थंडीचे प्रमाण वाढल्यावर रॉबर्टची पंचाईत झाली. बाहेरील वातावरणापेक्षा तुरूंगातील वातावरण त्याला योग्य असल्याची जाणीव त्याला होऊ लागली. थंडीने गारठलेल्या रॉबर्टने कसेबसे एक हॉटेल गाठले आणि तिथल्याच एका कर्मचाऱयाला सांगून त्याने फोनवरून तरुंग प्रशासनाशी संपर्क साधला. स्वत:च जागेची माहिती दिली तसेच येऊन मला घेऊन जा अशी विनंती त्याने पोलिसांना केली.
अमेरिकेतील सर्वच राज्ये गोठली
सांगितलेल्या ठिकाणी पोलीस दाखल झाले. रॉबर्टची गारठलेली अवस्था बघून पोलिसांना संपूर्ण प्रकार लक्षात आला आणि त्याला अटक केली.