केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केरळमधील राजकीय वातावरण आता चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी LDF, काँग्रेसप्रणीत UDF आणि भाजपाप्रणीत NDA या तीन प्रमुख धुरंधरांमध्ये केरळ विधानसभेचा सामना रंगणार असून त्यासाठी तिन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. मेट्रे मॅन ई. श्रीधरन यांना भाजपानं मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यापासून या निवडणुकीत अधिकच रंगत भरली गेली आहे. या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांवर तोंडसुख घेतलं आहे. “एकीकडे भाजपानं देशातली लोकशाही विकायला काढली असताना दुसरीकडे काँग्रेसनं स्वत:लाच विकायला काढलं आहे. अनेक राज्यांमध्ये लोकांनी काँग्रेसला सत्तेत निवडून दिलं होतं. पण त्यांनी तर स्वत:लाच भाजपाला विकून टाकलं”, अशा शब्दांत विजयन यांनी काँग्रेस आणि भाजपावर टीका केली आहे.

६ एप्रिल रोजी केरळमध्ये मतदान

६ एप्रिल रोजी केरळ विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्यामुळे केरळ, पुद्दुचेरी, आसाम, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाचही राज्यांचे निकाल २ मे रोजी लावण्यात येणार आहेत. २९ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.

 

“काँग्रेसवर विश्वास ठेवता येणार नाही”

पिनरायी विजयन यांनी ट्वीटरच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजपावर निशाणा साधला आहे. “हवा तेवढा पैसा ओतायला भाजपा तयार आहे. कारण त्यांनी तो तेवढ्या प्रमाणात जमा देखील केला आहे. आणि काँग्रेस सर्वात मोठी बोली लावून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे”, असं ते म्हणाले आहेत. गोवा, मणिपूर, मध्य प्रदेश, कर्नाटक, पुद्दुचेरी, नागालँड, त्रिपुरा या ठिकाणी काँग्रेसचे अनेक नेते भाजपामध्ये दाखल झाल्याचा दावा त्यांनी केला. “काँग्रेस पक्षावर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही. कारण त्यांचे नेते कधीही भाजपामध्ये दाखल होऊ शकतात. काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये असताना सीएएला विरोध केला आणि आता भाजपामध्ये गेल्यावर ते सीएएला पाठिंबा देत आहेत”, असं देखील विजयन म्हणाले.