श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर दहशतवाद्यांनी आणखी एक मोठा कट रचल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी आयसिसचे 15 दहशतवादी लक्षद्वीपमार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली आहे. यानंतर भारताच्या किनारपट्टींची सुरक्षा वाढवण्यात आली असून केरळ किनारपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

श्रीलंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 23 मे रोजी एक अलर्ट जारी केला आहे. आयसिसचे 15 दहशतवादी बोटीतून लक्षद्वीपच्या दिशेने जात असल्याची माहिती यामध्ये देण्यात आली. तसेच या दहशतवाद्यांनी मोठा कट रटल्याचेही यामध्ये सांगण्यात आले. या अलर्टनंतर गुप्तचर यंत्रणेने त्वरित पावले उचलत केरळ पोलीस आणि तटरक्षक दलाला हायअलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मच्छीमारांनाही अलर्ट राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार असा अलर्ट अनेकदा देण्यात येतो. परंतु यावेळी दहशतवाद्यांच्या संख्येसह अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळेच तातडीने केरळ किनारपट्टीची सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तसेच श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. मच्छीमार आणि समुद्रात जाणाऱ्या अन्य लोकांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने पालक्काड येथील एका तरूणाला दहशतवादी कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. रियास अबूबकर असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव असून त्याने तपासादरम्यान श्रीलंकेतील हल्ल्याचा मास्टरमाइंड जहरान हाशिम याच्याकडून प्रेरणा घेतल्याची कबूल केले होते.

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर इसिसचे दहशतवादी भारतात हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासादरम्यान समोर आली होती. नुकतेच इराक आणि सीरीयामधून आयसिसच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. श्रीलंकेत 21 एप्रिल रोजी 8 साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले होते. यामध्ये 250 पेक्षा अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.