Kerala Floods: केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराशी सामना करत असलेल्या लोकांविरोधात असंवेदनशील कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्याला एका गल्फ कंपनीने कामावरून काढून टाकले आहे. केरळच्याच असलेल्या या कर्मचाऱ्याने पूरग्रस्तांप्रती सोशल मीडियावर असंवेदनशील कमेंट केल्याचा आरोप आहे. ‘एएनआय’ने दुबईमधील ‘खलीज टाइम्स’च्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार लुलु ग्रूप इंटरनॅशनल कंपनीचा कर्मचारी राहुल चेरू पलायट्टूला नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. तो ओमान येथे कंपनीच्या एका शाखेत रोखपाल म्हणून काम करत होता.

राहुलने फेसबुक पोस्टमधून केरळ पूरग्रस्तांच्या स्वच्छतेची खिल्ली उडवली होती, असाही त्याच्यावर आरोप आहे. त्याच्या या कृत्यामुळे कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक नस्त्र मुबारक सलेम-अल-मावाली यांनी त्याला कामावरून कमी केल्याचे पत्र दिले आहे. तुम्हाला तात्काळ प्रभावाने नोकरीवरून काढण्यात येत आहे. केरळमधील पूरग्रस्तांबाबत तुम्ही अत्यंत असंवेदनशील आणि अपमानजन कमेंट केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पत्रात म्हटले आहे.

आपल्या पोस्टचा विरोध केला जात असल्याचे लक्षात येताच राहुलने एक व्हिडिओ शेअर करत लोकांची माफीही मागितली. मी माझ्या कृत्याबाबत माफी मागतो. जेव्हा मी ती पोस्ट शेअर केली, तेव्हा मी नशेच्या अमलाखाली होतो. मी इतकी मोठी चूक केली असेल याची मला काहीच कल्पना नव्हती, असे त्याने म्हटले होते. दुसरीकडे लुलु समूहाचे अधिकारी व्ही. नंदकुमार यांनी राहुलच्या कृतीची लगेच दाखल घेऊन त्याला कामावरून काढण्यात आल्याचे सांगितले. आमच्या भूमिकेमुळे आमची कंपनी मानवतावादी मूल्य आणि उच्च नैतिक प्रथांसाठी उभी असल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अब्जाधीश आणि लुलु समूहाचे प्रमुख एम ए युसूफ अली यांनी केरळमधील पूरग्रस्तांसाठी ९०.२३ लाख दिरहॅमची मदत केली आहे.