Kerala floods. केरळमध्ये पुराने थैमान घातलेलं असतानाच अनेकजण या राज्यातील नागरिकांसाठी शक्य त्या सर्व परिंनी मदतीचा हात पुढे करत आहेत. त्यातच खालसा एड इंटरनॅशनलचे स्वयंसेवकही मागे राहिलेले नाहीत. युकेमधील शीख समुदायातील काही मंडळी थेट पूरग्रस्त केरळमध्ये दाखल झाले आहेत. कोचीमध्ये ही मंडळी दाखल झाली असून त्यांनी पूरग्रस्तांसाठी जेवणासाठीचे मोफत लंगर सुरु केले आहेत.

केरळमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये खालसा समुदायाच्या स्वयंसेवकांचं हे मदतकार्य कुठेतरी केरळमधील पूरग्रस्तांठी अतिशय मौल्यवान ठरत आहे. सोशल मीडियावर या स्वयंसेवकांचे फोटो व्हायरल झाले असून, पुन्हा एकदा शीख समुदायाच्या दानशूर वृत्तीच्याच चर्चा पाहायला मिळत आहेत. अतिवृष्टीमुळे केरळात आलेल्या महापूरात आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला असून जिवीत आणि वित्तहानीच्या आकड्याचा अंदाजही लावता येणं अशक्य झालं आहे. अशातच देशभरातून आणि परदेशातूनही अनेकांनीच या राज्याला मदत करण्यास सुरुवात केली आहे.

Kerala floods: पूरग्रस्तांच्या मदतीस आयएएस अधिकारी आले धावून; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं सोशल मीडियावर कौतुक

वाचा : निपाहमुळे जीव गमावणाऱ्या नर्सच्या पतीची माणूसकी, पहिला पगार पूरग्रस्तांना

दरम्यान, सध्या केरळमध्ये लंगर सेवा पुरवणाऱ्या शीख स्वयंसेवकांनी कोची येथील गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा यांच्या सहाय्याने समुदायाच्या मोठ्या स्वयंपाकघरात लंगर बनवण्यास सुरुवात केली. केरळमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून, मोठ्या प्रमाणात स्थानिकांना आपली राहती घरं सोडून बचाव शिबिरांमध्ये स्थलांतरित व्हावं लागलं आहे. अनेक ठिकाणचा संपर्क तुटल्यामुळे बचावकार्यातही बऱ्याच अडचणी येत आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला राज्यशासनासोबत, केंद्रातूनही या राज्याला मदतीचा हात देण्यात आला असून परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी अशीच प्रार्थनाही करण्यात येत आहे.