निदर्शने करण्यावरून पाटीदार समाजात दोन गट
इतर मागासवर्गीय संवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी पाटीदार समाजाचे गुजरातमध्ये आंदोलन सुरू असतानाच, २५ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्धच्या प्रस्तावित मेळाव्याला अमेरिकेतील एका नामवंत पाटीदार गटाने विरोध केला आहे, तर दुसऱ्या संघटनेने मोदी यांच्या सिलिकॉन व्हॅलीच्या भेटीदरम्यान निदर्शने करण्याची धमकी दिली आहे.
मोदी हे २३ ते २८ सप्टेंबरदरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ते संयुक्त राष्ट्रसंघात भाषण करण्याचीही अपेक्षा आहे. नॉर्थ कॅरोलिनातील बलदेव ठाकोर यांच्या नावाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात गुजरात पाटीदार समाजाने मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विदेशातील पाटीदार समाजाचे सदस्य म्हणून आम्ही या प्रस्तावित मेळाव्याचा निषेध करतो. ही राजकीय चिखलफेक असून आम्ही त्यात सहभागी होऊ इच्छित नाही, असे या पत्रकात म्हटले आहे.
तथापि, पाटीदार समाजाच्या दुसऱ्या एका गटाने मोदी यांच्या पुढील आठवडय़ात कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅलीत होणाऱ्या भेटीच्या वेळी निदर्शने करण्यासाठी बैठक घेतली.