दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. बेदी विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बेदी पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील का, याचा निर्णय संसदीय पक्ष घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी बेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती देण्यात आली. मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्त्वामुळेच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बेदी यांनी पत्रकारांना सांगितले. त्या म्हणाल्या, मोदींमुळे देशात आशावाद निर्माण झाला आहे. त्यांच्यामुळे अनेक लोक स्वतःहून बदललले आहेत. माझ्याकडे ४० वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. पोलीस सेवेमध्ये मी वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. त्याचा फायदा दिल्लीकरांना मिळवून देण्यासाठीच आपण निवडणूक लढविण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी सांगितले.
बेदी यांच्या प्रवेशामुळे भाजपला ताकद मिळणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.