‘पंतप्रधानपदावर मोदी नकोतच’ असे सांगत नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेणारे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी मात्र आता गुजरातच्या उद्योजकीय आणि पायाभूत सोयीसुविधांच्या विकासाचे गुणगान केले. परंतु आरोग्य, शिक्षण व अल्पसंख्याकांचे रक्षण या मुद्दय़ांवर गुजरात मागेच राहिल्याच्या मतावर मात्र सेन ठाम राहिले.
‘अ‍ॅन अनसर्टन ग्लोरी : इंडिया अँड इट्स काँट्रॅडिक्शन्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सोमवारी सायंकाळी सेन यांनी गुजरातच्या विकासाबाबत पुन्हा एकदा मतप्रदर्शन केले. पुस्तकाचे लेखन स्वत: सेन आणि जॉन ड्रेझ यांनी केले आहे. या वेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीत सेन यांनी गुजरातबद्दल पुन्हा एकदा मते मांडली. ते म्हणाले, ‘गुजरात राज्याने गेल्या काही काळात चांगला विकास साधला असला तरी आरोग्य, शिक्षण व अल्पसंख्याकांचे रक्षण या मुद्दय़ांवर हे राज्य मागासलेलेच राहिले आहे. केरळ, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश आदी राज्यांकडूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे’. पुस्तक लेखनाच्या निमित्ताने आपल्याला देशाच्या विकासाबाबत विविध अनुभव आल्याचेही सेन यांनी स्पष्ट केले. एके काळी लालफितीचा कारभार आणि अल्प उत्पन्न यांमुळे केरळ पार रसातळाला गेला होता. मात्र केरळने शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात अलौकिक प्रगती साधत राज्याचा एकूण चेहरामोहराच बदलून टाकला आहे. तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश यांनीही थक्क व्हावे असा विकास साधला असल्याचे सेन यांनी निदर्शनास आणून दिले. गुजरातने अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली असली तरी गतिमान प्रशासन, व्यापारवृद्धी व पायाभूत सोयीसुविधांचा जलदगतीने विकास या बाबतीत या राज्याकडून बरेच काही शिकण्यासारखे असल्याचे सेन म्हणाले.